अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाची मुंबईत हत्या, तिघांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाची मुंबईत हत्या, तिघांना अटक

मुंबई, ९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना (४५) यांची हत्या केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पूर्व वैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.


याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


भायखळा येथील रेतीवाला इंजस्ट्रीज समोरील अनंत पवार मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार जवळच असलेल्या काळाचौकी पोलीस ठाण्याच्या मोबाइल व्हॅनला घटनास्थळी पाठवण्यात आले. जखमी अवस्थेत आढळलेल्या कुर्मी यांना पोलिसांनी तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मानेवर, हातावर, पोटावर व छातीवर गंभीर जखमा झाल्या असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय होता. हल्लेखोर दुचाकीवरून तेथे आले व त्यांनी सचिन कुर्मीवर हल्ला केला, या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी तपास केला असता आरोपी बदलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर आनंदा अशोक काळे ऊर्फ आण्या (३९), विजय ज्ञानेश्वर काकडे ऊर्फ पप्या (३४) व प्रफुल्ल प्रवीण पाटकर (२६) यांना अटक करण्यात आली. यातील काळे व काकडे दोघेही घोडपदेव परिसरातील रहिवासी असून पाटकर आग्रीपाडा येथे राहतो. यातील काळे ऊर्फ आण्याविरोधात भायखळा, आग्रीपाडा, मानखुर्द, अ‍ॅन्टॉपहिल व धारावी पोलीस ठाण्यात मिळून १० गुन्हे दाखल आहेत. त्यात मारमारी, हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. 


काकडे ऊर्फ पप्प्याविरोधातही भायखळा पोलीस ठाण्यात मारमारीचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच पाटकरविरोधात भायखळा, अ‍ॅन्टॉपहिल व धारावी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपींना याप्रकरणी १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींवर सचिन कुर्मीमुळे गुन्हे दाखल झाल्याचे त्यांना वाटत होते. त्या रागातून त्यांनी हत्या केल्याचे सांगितले आहे. पोलीस या दाव्याची पडताळणी करत आहेत. मृत सचिन कुर्मी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा जवळचा कार्यकर्ता होता. अनेक वर्षांपासून ते भुजबळ कुटुंबियांचे कट्टर समर्थक होते. भुजबळ कुटुंबियांनी अजित पवार यांच्यासह जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सचिन कुर्मी हेदेखील त्याच्यांसह गेले. ते राष्ट्रवादीचे (अजित पवार) भायखळा तालुका अध्यक्ष म्हणून काम करीत होते, असे सूत्रांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज