मुंबई, दि. ११: बृहन्मुंबई ‘ई’ विभाग क्षेत्रात डायलेसीस सेंटर सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री सत्यवान नर यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांची भेट घेऊन केली. यावेळी सोबत संस्थेचे सल्लागार आमदार विजय (भाई) गिरकर, सह आयुक्त चंद्रशेखर चौरे, मयूर देवळेकर, ट्रस्टचे सल्लागार सुनिल मांजरेकर हे देखील उपस्थित होते.

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट गेली १५ वर्षे मुंबई व ग्रामीण क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून आरोग्य क्षेत्राशी निगडीत अनेक उपक्रम, शिबिरे राबवत असते.
सध्या किडनी व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने अनेक रुग्ण दगावण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतात किडनी विकारानं त्रस्त लोकांचं नेमकं प्रमाण सध्या किती आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण ज्या पंधरा आजारांमुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात, त्यात किडनीच्या विकारांचाही समावेश आहे. मुंबईचा विचार केला, तर शहरात सध्या पन्नास ते साठ हजार व्यक्तींना डायलिसिसची गरज असल्याचं या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात. मात्र मुंबई उपलब्ध असलेली डायलेसीस सेंटर अपुरी पडताना दिसत आहेत. तसेच खाजगी डायलेसीस सेंटर मधील उपचार गरीब रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने बृहन्मुंबई ‘ई’ विभाग क्षेत्रात डायलेसीस सेंटर सुरु करू इच्छित आहोत. यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा आमच्या संस्थेच्या वतीने उभी केली जाईल. त्याकरिता बृहन्मुंबई ‘ई’ विभाग क्षेत्रात डायलेसीस सेंटर सुरु करण्याकरिता महापालिकेची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. यावर महापालिका आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवत याबाबत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा