ओडिशातून पाच जणांना अटक
मुंबई, दि. ११ : टास्क पूर्ण करण्याचा पार्ट टाइम जॉब देण्याच्या नावाखाली ४३ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील ५ जणांना सायबर पोलिसांनी ओडिशात बेड्या ठोकल्या. प्रमोदकुमार बेहेरा (२६), राकेशकुमार चौधरी (२७), सुर्वेदू दास (३०), जयदीप परिडा (२४), मनोजकुमार राऊत (२९) अशी आरोपींची नावे आहेत.तक्रारदाराला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागातून बोलत असल्याचे सांगून पार्ट टाइम जॉबची ऑफर देण्यात आली. तसेच त्याला इन्स्टाग्राम अकाउंटच्या यूआरएल, लिंक्स व युजर नेम पाठविले. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करून त्याचे स्क्रीन शॉट्स पाठविण्यास सांगून टास्क पूर्ण करण्याचे काम तक्रारदाराला देण्यात आले. त्यानुसार टास्क पूर्ण करताच त्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्याला टास्क पूर्ण करण्यासह गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याने ४३ लाख ६२ हजार रुपये गुंतविले. मात्र, त्याला ना नफा मिळाला, ना गुंतविलेली रक्कम. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलिसात तक्रार दिली. पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.
सायबर विभागाच्या पोलिसांनी ओडिशातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक केली. त्याचबरोबर ६ लाख ९९ हजार रुपयांची रोकड गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा