दोन धाडसी पोलिसांनी महिलेला वाचवले
मुंबई, दादासाहेब येंधे : समुद्राला भरती आलेली असताना त्यात एक महिला समुद्रात पडली. हे समजताच तेथे तैनात असलेल्या दोघा पोलिसांनी जिवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेत त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे हद्दीत, सुंदर महल जंक्शन या ठिकाणी एक महिला समुद्रातील पाण्यात बुडत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. कर्तव्यावर असलेल्या पो. शि. किरण ठाकरे व पो. शि. अमोल दहिफळे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समुद्राच्या पाण्यात उडी मारून त्या महिलेचा जीव वाचविला.
क्लिक करा, व्हिडिओ👇 पहा...
माटुंगा येथे राहणाऱ्या स्वाती कनानी (५९) ही महिला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे हद्दीतील सुंदर महल जंक्शन या ठिकाणी समुद्र किनाऱ्याच्या कठडय़ावर येऊन बसली होती. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास त्या समुद्रात बुडत असल्याचे तेथे तैनात असलेल्या सीपीआर प्लाटूनमधील पोलिसांच्या नजरेस पडली. ताबडतोब अंमलदार किरण ठाकरे आणि अमोल दहिफळे यांनी रस्सी, लाईफ जॅकेट, टायर आदी साहित्य घेऊन थेट समुद्रात स्वतःला झोकून दिले. भरतीमुळे समुद्राला उधाण आलेले असतानाही पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी टाकून कनानी हिला सुखरूप बाहेर काढले. कनानी हिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कनानी ही नैराश्यामध्ये असून ती समुद्रकिनारी येऊन कठडय़ावर बसली होती. त्यावेळी तिची पर्स खाली पडली. पर्स घेण्याच्या प्रयत्नात असताना तिचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी ट्विटरद्वारे देखील अशी माहिती कळविली आहे.
Photo, video: viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा