मुंबई, ७ : इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवत घरात घुसून १८ लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या आठ चोरट्यांना सायन पोलिसांनी अटक केली आहे. संतोष पृथ्वीलाल पटले (वय, ३७), राजाराम दादू मांगले (वय, ४७), अमरदीप लक्ष्मण सोनवणे (वय,२९), भाऊराव उत्तम इंगळे (वय, ५२), सुशांत रामचंद्र लोहार (वय, ३३), शरद हनुमंत एकावडे (वय, ३३), अभय लक्ष्मण कासले (वय, ३३), रामकुमार छोटेलाल गुजर (वय, ३८) अशी या भामट्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर चोरी तसेच फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्याचे सपोनी संतोष तागड आणि पोउनि. किरण भोसले अधिक तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सायन पूर्व टी बी चिदंबरम मार्गावरील प्रेमसदन इमारतीमध्ये राहणाऱ्या श्रीलता रामकुबेर पटवा यांच्या घरी चार अनोळखी इसम घरी आले. आपण इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून घरातील कपाटाची त्यांनी झाडाझडती घेतली असता महिलेने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी कपाटात ठेवलेले १८ लाख रुपये काढून घेऊन त्यांनी तेथून पळ काढला. इमारती बाहेर एक व्यक्ती कार घेऊन उभा असल्याचे लक्षात येताच त्या महिलेने सायन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
0 टिप्पण्या