मुंबई, दि. २९ : सिगारेटच्या धुरामुळे झालेल्या वादातून फ्रान्सिस उर्फ शाफी फर्नांडिस (वय, ५१) यांची चौघांनी चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अब्बास मोहम्मद अली शेख याला अटक केली आहे.
वांद्रे येथील चंपल रोड परिसरात वास्तव्यास असलेले फ्रान्सिस उर्फ शाफी हे इस्टेट एजंट होते. ते नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम आटोपून कुटुंबीयांसोबत घरी परतत होते. त्यावेळी एक तरुण सिगारेट ओढत उभा होता. त्याने सोडलेल्या धुराचा त्रास शाफी यांच्या पत्नीला झाला. हे पाहून त्यांनी त्या तरुणाला जाब विचारला होता.
त्यावेळी त्या ठिकाणी असलेली एक महिला आणि अब्बास यांनी शाफी यांना शिवीगाळ कर्क. त्यांनी आणखी दोघांना या ठिकाणी बोलावले. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या तिघांनी मिळून शाफी यांच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी शाफी यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
0 टिप्पण्या