भाऊचा धक्का येथील घटना
२७/१२/२०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : अंजनी पुत्र ही मच्छीमार मच्छिमार बोट मंगळवारी मध्यरात्री किरण भाई तांडेल यांनी न्यू फीश जेटी येथे आणली होती. त्यानंतर सकाळी सदर बोटीतील तीन खाणांमधील मच्छी विकण्यासाठी बाहेर काढण्याचे काम केले जात होते. त्यावेळी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारात एक मच्छीमार मच्छी काढण्यासाठी बोटीत उतरला असता अचानक तो बेशुद्ध होऊन पडला. त्यामुळे तेथे अन्य दोघेजण आतमध्ये उतरले आणि त्यांनी त्या कामगारास बाहेर काढले. त्याच्याकडे अन्य कर्मचारी बघत असताना आतमध्ये उतरलेले श्रीनिवासुलु यादव (वय, ३५) आणि नोकरीचा मालक नागाडोन यादव (वय, २७) हे दोघेदेखील बेशुद्ध पडले. त्यानंतर बोटीवरील अन्य तिघेही बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना ताबडतोब जे. जे. रुग्णालयात टॅक्सीने नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी बी श्रीनिवासुलु आणि नागाडोन या दोघांना तपासून मयत घोषित केले. तर सुरेश मेकला (वय, २८) याला अतिदक्षता विभागात दाखल केले असून इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे याप्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मासेमारीच्या दरम्यान पकडलेले मासे साठवण्यासाठी बोटीतच स्टोरेज बॉक्स तयार करण्यात आला होता. या ठिकाणी बर्फ टाकून त्यामध्ये पंधरा दिवसात पकडलेले मासे साठवण्यात आले होते. मात्र, येथील बर्फ वितळल्याने आतमध्ये दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीतून गॅस निर्माण झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मच्छीमार मासे काढण्यासाठी खाली खणात उतरताच याच दरम्यान झालेल्या दुर्गंधीयुक्त गॅसच्या वासाने ते बेशुद्ध पडले व त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
0 टिप्पण्या