पोटच्या २ मुलांना ७४ हजारात विकलं
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतून एक हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका दाम्पत्याने पोटच्या मुलाला ६० हजार आणि नवजात मुलीला १४ हजार रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे.
यामागचं कारण तर आणखीच धक्कादायक आहे. नशा करता यावी यासाठी या दाम्पत्याने हे धक्कादायक कृत्य केलं. दोघांना ड्रग्जचं व्यसन होतं. याच कारणामुळे नशेसाठी पैसे पुरत नव्हते. यामुळे त्यांनी मुलगा हुसेन याला दीड वर्षांपूर्वी आणि नवजात मुलीला जन्मताच १ ऑक्टोबर रोजी विकलं होतं. शब्बीर आणि सानिया खान असं या दाम्पत्याचे नाव आहे. वांद्रे परिसरात राहणाऱ्या रुबिना खान यांच्या तक्रारीवरून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुबिना यांचा भाऊ असलेला शब्बीर हा लग्नानंतर त्याच्या कुटुंबीयांसोबत राहण्यास आला. शब्बीर आणि सानिया हे दोघंही नवरा बायको ड्रग्जच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडण व्हायचं. यामुळे सानिया घर सोडून वर्सोव्यात माहेरी राहण्यासाठी गेली. २०१९ मध्ये त्यांना सुभान नावाचा एक मुलगा झाला. सानियाच्या आईच्या निधनानंतर दोघंही नालासोपारा येथे भाड्याने राहू लागले. तिथे त्यांना २०२२ मध्ये हुसेन नावाचा मुलगा झाला. तर, १ ऑक्टोबर २०२३ ला एक मुलगी झाली. या दाम्पत्याने हुसेन आणि नवजात मुलीला विकलं होतं.
शेवटी पैशांची अडचण भासू लागल्याने हे दाम्पत्य बुधवारी रुबिनाच्या घरी राहण्यास आलं. यावेळी शब्बीरसोबत फक्त चार वर्षांचा सुभान होता. त्यामुळे रुबिनाला संशय आला. तिने इतर मुलांची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार ऐकून रुबिना यांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेत अटकेची प्रक्रिया सुरू आहे. मुलीचा शोध लागला असून मुलाचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखा याप्रकरणी सखोल चौकशी करत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा