मुंबईकर महिलांना बृहन्मुंबई महानगरपालिकेची अनोखी भेट !
महिलांसाठीच्या राखीव सत्रांसाठीच्या प्रवेशासाठी २५ टक्क्यांची सवलत
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील सातत्याने घेत असते. याच काळजीचा एक भाग म्हणजे महानगरपालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या क्रीडा विषयक सोयी-सुविधा ! याच दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ४ जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. या चारही जलतरण तलावांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ ही सत्रे केवळ महिलांसाठी राखीव आहेत. या महिलांसाठीच्या सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या महिलांना सभासद शुल्कामध्ये तब्बल २५ टक्क्यांची सूट देण्यास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. दिनांक ८ मार्च रोजी साज-या होणा-या महिला दिनाचे औचित्य साधून ही अनोखी भेट मुंबईकर महिलांना देण्याची कार्यवाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. किशोर गांधी यांनी कळविले आहे की, सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ४ जलतरण तलाव कार्यरत आहेत. या ठिकाणी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सभासदत्व प्राप्त करुन घेता येते. यासाठी जलतरण तलावाच्या प्रकारानुसार शुल्क आकारणी केली जाते. या अंतर्गत वार्षिक शुल्क रुपये ८,०००/- ते रुपये १०,१००/- इतके आहे. तसेच त्रैमासिक व मासिक सभासदत्वाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
येत्या दिनांक ८ मार्च रोजीच्या महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठीच्या राखीव सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या महिलांना २५ टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली आहे. यामुळे सध्या असणारे मोठ्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये १०,१००/- च्या ऐवजी रुपये ७,७००/- इतके होईल. तर छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये ८,०००/- च्या ऐवजी रुपये ६,०८०/- इतके होईल. याच पद्धतीने त्रैमासिक व मासिक शुल्कात देखील २५ टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेचे आणखी एक ठळक वैशिष्ट म्हणजे आधीपासून सभासद असणा-या महिलांना देखील ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार इच्छुक महिलांनी तसा अर्ज जलतरण तलाव व्यवस्थापकांकडे दिल्यास त्यांनी पूर्वी भरलेल्या शुल्काचे व उपयोगात आणलेल्या कालावधीचे परिगणन करुन त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात येत असलेल्या या योजनेत नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठीची ऑनलाईन लिंक ही दिनांक ८ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यान्वित होणार आहे. तरी इच्छुक महिलांनी https.//swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे नाट्यगृह व जलतरण तलावांचे समन्वयक श्री. संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे.
जसंवि/४३२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा