Ticker

6/recent/ticker-posts

घराच्या मागचे लोखंडी ग्रील तोडून चोरी

तळमजल्यावरील बंद घरांना टार्गेट करणारा  चोर गजाआड

मुंबई, दि. २१ : तळमजल्यावरील बंद घरांच्या मागची खिडकी तोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराला विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने विक्रोळी हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.




विक्रोळी परिसरातील गेल्या काही दिवसांपासून तळमजल्यावर असलेल्या बंद घराच्या मागील बाजूकडील ग्रील तोडून घरफोडीचे गुन्हे सातत्याने वाढत होते. याची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त धर्मपाल बनसोडे व वरिष्ठ निरीक्षक शुभदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घरफोडी करणाऱ्या चोराचा शोध सुरू केला. कन्नमवार नगर मधील ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे किंवा ज्या इमारती पुनर्विकासासाठी देण्यात आल्या आहेत अशा इमारतींमध्ये घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिस पथकाने अशा इमारतींच्या ठिकाणी गस्त वाढवली तसेच त्या ठिकाणी सापळा लावण्यास सुरुवात केली. 


शोधाशोध सुरू असताना प्रगती मैदानाजवळ पोलिसांना एक संशयित व्यक्ती हालचाल करताना दिसली. त्याला हटकले असता तो अभिलेखावरील गुन्हेगार पारस परमार हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पकडून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले. त्यामुळे त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने विक्रोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आदी मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पारस याच्याविरोधात वेगवेगळ्या सात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या