वडाळ्यात पोलिसाने स्वतः वर वार झेलत तरुणीला वाचवलं
मुंबई, दादासाहेब येंधे : दिवसाढवळ्या एका मुलीवर हल्ला करण्यात आला... माथेफिरूने चाकूने वार करण्याच्या हेतूने मुलीच्या दिशेने धाव घेतली. प्रसंगावधान राखत पोलीस मध्ये पडला. चाकूने सपासप होणारे वार आपल्या अंगावर झेलले... अन तरुणीचा जीव वाचविला.
बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास सदर घटना घडली आहे. एक २५ वर्षीय तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी बरकतअली नाका येथील बसथांब्याकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना, पाठीमागून आलेल्या अनिल बाबरने (३१) तिच्यावर चाकूने हल्ला केला.
यादरम्यान तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई मयूर पाटील यांचे लक्ष जाताच त्यांनी तात्काळ तरुणीकडे धाव घेत तरुणीची सुटका केली. यामध्ये तिला वाचवत असताना मयूर यांच्या हातावर देखील वार झाले. ते जखमी झाले. हातातून भळाभळा रक्त वाहत होते. पण, त्याची पर्वा न करता त्यांनी मोठया हिमतीने त्या हल्लेखोराला रोखले व त्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार कळताच तेथे तैनात अन्य पोलिसांनी अनिलला पकडले.
अनिल बाबर आणि जखमी झालेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने तरुणीच्या कुटुंबीयांकडे लग्नाची बोलणी केली. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला. त्यानंतर बाबरने त्या तरुणीचा पुन्हा पाठलाग करत तिच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. पण, तरुणीने त्याचा हात झटकून पुढे निघाली. याच रागात त्याने जवळील चाकूने तिच्या पाठीवर वार केले. मात्र, पाटील यांनी तिच्याकडे धाव घेत तरुणीचे प्राण वाचविले.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा