अमर महल ते ट्रॉम्बे जलबोगदा प्रकल्प
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत, अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचे खनन आज (दिनांक ६ मे २०२२) पूर्ण झाले आहे.
पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’, ‘एम/पश्चिम’ व ‘एल’ विभागाच्या काही भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी व भविष्यातील वाढीव पाणीपुरवठ्याचा विचार करुन, पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत हा एकूण सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरु आहे. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असताना देखील त्यावर मात करुन, या जलबोगद्याच्या कामात प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाईल, याचा महानगरपालिका प्रशासनाला ठाम विश्वास आहे.
या जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर. सी. एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र (भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर) येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱया कूपकाचे काम प्रगतिपथावर आहे.
बोगद्याच्या खोदकामासाठी, हेडगेवार उद्यान येथील कूपकात बोगदा खनन यंत्र (TBM) उतरविण्यात आले आहे. या यंत्राच्या सहाय्याने जलबोगदा खोदकामाचा शुभारंभ राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ०६ मार्च २०२१ रोजी करण्यात आला होता. जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर हा जलबोगदा बांधण्यात येत आहे. त्याचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या बोगद्याच्या खोदकामात अनेक भूगर्भीय अडचणी आलेल्या असताना देखील जानेवारी २०२२ या महिन्यात विक्रमी ६५३ मीटर खनन करण्यात आले होते. त्याचवेळी एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरी देखील एकाच आठवड्यात दोनवेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली होती. पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर खनन आज विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झालेले असून, ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पाच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार मेसर्स टाटा कन्सल्टींग इंजिनियर्स लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार व मेसर्स पटेल इंजिनियरिंग लिमिटेड यांची कंत्राटदार म्हणून महानगरपालिकेतर्फे नेमणूक करण्यात आलेली आहे.
जसंवि/०६४

0 टिप्पण्या