पार्वती प्रसाद हरी गंगा बोटींवर पोलिसांची कारवाई
मुंबई : भर समुद्रात डिझेलचा काळाबाजार करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या दोन बोटींवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. त्या बोटीमध्ये लपवून ठेवलेला तब्बल १० लाख ४० हजार किमतीचा १० हजार ९५० लिटर डिझेल पोलिसांनी हस्तगत केले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
समुद्रात पार्वती प्रसाद, हरीगंगा बोटीमध्ये बेकायदेशीरपणे डिझेलचा साठा करून ठेवला असून ते डिझेल मच्छीमार बोटींना विकले जाते. यामुळे शासनाचा महसूल बुडविला जात असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कोकरे, खेडकर, एपीआय विशाल गायकवाड, उपनिरीक्षक गावकर व पथकाने समुद्रात धाड टाकत पार्वती प्रसाद व हरीगंगा या दोन बोटी ताब्यात घेतल्या. पार्वती प्रसाद बोटीमध्ये लपवलेले ९ हजार ३५० लिटर तर हरीगंगा बोटीमध्ये १६०० लिटरचा साठा सापडला. दोन्ही बोटीमध्ये मिळून १० लाख ४० हजार किमतीचा डिझेल साठा आढळला.
डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या दीपक कुमार तांडेल आणि सुरेश भाई तांडेल अशा दोघांना पोलिसांच्या पथकाने पकडले. परदेशातून येणाऱ्या मोठ्या जहाजात उरलेले डिझेल हे स्वस्तात खरेदी करत होते. मग त्या डिझेलला थोड्या जास्त किमतीत पण बाजारभावापेक्षा कमी दरात मच्छिमार बोटींना विकत असत. अशा प्रकारचा काळाबाजार समुद्रात सुरू होता. पोलिसांनी डिझेल, दोन बोटी असा ८० लाख ४० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा