कूपरेज बँडस्टँड येथे ४ आणि ५ मार्च २०२२ रोजी रंगणार एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सव - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, ३ मार्च, २०२२

demo-image

कूपरेज बँडस्टँड येथे ४ आणि ५ मार्च २०२२ रोजी रंगणार एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सव

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राचा उपक्रम


दक्षिण मुंबईत स्थित कूपरेज बँडस्टँड उद्यान येथे राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्) यांच्यावतीने शुक्रवार, दिनांक ४ मार्च २०२२ आणि शनिवार, दिनांक ५ मार्च २०२२ तसेच शुक्रवार, दिनांक ११ मार्च २०२२ आणि शनिवार, दिनांक १२ मार्च २०२२ असे ४ दिवस ‘एनसीपीए ऍट दी पार्क’ हा संगीत व कला महोत्सव सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हा ४ दिवसीय महोत्सव होणार आहे. 

या महोत्सवात दिनांक ४ मार्च २०२२ रोजी ‘सिंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’चे कलाकार वॉल्झ, मार्चेस, पोल्फा यासारख्या संगीत प्रकारांचे सादरीकरण करतील. दिनांक ५ मार्च २०२२ रोजी ‘अनइरेझ पोएट्री’ हा भारतातील सर्वात मोठा बोलभाषा गट अनोख्या काव्यात्मक छंदांत गुंफून गद्य कथा सादर करणार आहेत. दिनांक ११ मार्च २०२२ रोजी वसंत उत्सवात लावणी, टागोर नृत्य आणि कथ्थक अशा भारतातल्या विभिन्न नृत्यप्रकारांनी वसंत ऋतूचं आगमन साजरं केलं जाईल. तर दिनांक १२ मार्च २०२२ रोजी कोमल कुवाडेकर आणि जॅझ बँड यांच्यावतीने जॅझ, सोल, फंक व आर ऍण्ड बी सारख्या भावपूर्ण संगीत प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या चारही दिवशी प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश दिला जाईल. कोविड प्रतिबंधक सर्व निर्देशांचे पालन करुन हा उपक्रम राबविला जाणार आहे.


महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी या महोत्सवाला शुभेच्छा देताना नमूद केले आहे की, ‘संगीत, नाट्य, कला या क्षेत्रांमध्ये देखील बृहन्मुंबई महानगराचे मानाचे स्थान आहे. कोविड विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे मुंबईत मागील २ वर्षे संगीत व कला महोत्सवांचे आयोजन होऊ शकले नाही. कोविड परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा भाग म्हणून आणि संगीत व कला प्रकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राने हा उपक्रम आयोजित केला आहे. यातून मुंबईकरांचे मनोधैर्य उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.’   


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी सांगितले की,  ‘टाळेबंदीच्या परिस्थितीत संगीत, कला, नाट्यसृष्टीला देखील फटका सहन करावा लागला. कोविड स्थिती ओसरल्यानंतर मुंबई महानगरातील दैनंदिन जीवन आता रुळावर येत आहे. राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली संस्था आहे. ही बाब लक्षात घेता, सांस्कृतिक आयोजनांना नव्याने चालना मिळावी, या हेतूने ‘एनसीपीए ऍट दी पार्क’ महोत्सवाचे आयोजन महानगरपालिकेच्या कूपरेज बँडस्टँड उद्यानात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या महोत्सवामुळे देश-विदेश पातळीवर सकारात्मक संदेश जाईल.’ 












(जसंवि/६०१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *