विविध क्रीडा प्रकारांच्या गरजांनुसार मैदानामध्ये नानाविध उपयुक्त सुधारणा
मैदानाखाली आढळली ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी, जी आता वर्षा जल संचयनासाठी वापरणार !
मुंबईतील अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असणारे वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ हे ‘जांबोरी मैदान’ या नावानेही मुंबईकरांना सुपरिचित आहे. गेल्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने या मैदानात विविध क्रीडा प्रकारांना पूरक अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे या मैदानास एक अनोखे व अभिनव रुपडे बहाल झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कबड्डी - बॅडमिंटनसह इतरही खेळ खेळता येतील असे कोर्ट, फुटबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटींग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा, बसण्यासाठी बाक, सूर्यास्तानंतर मैदान उजळून निघावे यासाठी पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, एलईडी दिवे असणारे शोभिवंत झोके, एलईडी दिव्यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले आकर्षक नंबर गेम यासारख्या विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जांभोरी मैदानाचे रुपडे अधिक आकर्षक करणा-या या सुधारणा ‘जी दक्षिण’ विभागाने अवघ्या ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत केल्या आहेत. तसेच याबाबत आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे मैदानाची कामे सुरु असताना मैदानाच्या खाली सुमारे सव्वा लाख लीटर क्षमतेची ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली आहे. या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनासाठी करण्यात येणार आहे.
जांबोरी मैदानातील या सुधारणांबद्दल अधिक माहिती देताना ‘जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे यांनी सांगितले की, या मैदानात विविध क्रीडा उपयोगी सुविधा आणि सुधारणा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार या मैदानात आता विविध सुधारणा प्रत्यक्षात आल्या असून आणखी काही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणा-या मैदानात करण्यात आलेली व येत असलेली कामे ‘जिल्हा नियोजन समिती’च्या व महानगरपालिकेच्या प्रत्येकी ७५ लाख रुपये; यानुसार उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मा. वित्त मंत्री श्री. अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी नुकतीच या मैदानाची पाहणी केली व तेथे सुरू असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. हर्षद काळे यांच्या नेतृत्वात मैदानातील विविधस्तरिय सुधारणाविषयक कार्यवाही करण्यात आली आहे.
वरळीतील ऐतिहासिक जांबोरी मैदानात लवकरच खुले वाचनालय व त्यावर व्ह्युईन्ग डेक, योग केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधादेखील लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही कार्यवाही सध्या प्रगतीपथावर असल्याचेही श्री. शरद उघडे यांनी यानिमित्ताने सांगितले आहे. या १ लाख ४५ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण मैदानात करण्यात आलेल्या व सध्या प्रगतिपथावर असलेल्या विविध सुधारणांबाबत मुद्देनिहाय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे:-
१. मैदानावर १४ ठिकाणी पाण्याचे फवारे:- मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना खेळताना धुळीचा त्रास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मैदानात ओलावा रहावा व खेळताना धूळ उडून खेळाडूंना त्रास होऊ नये, यासाठी या मैदानात १४ ठिकाणी 'स्प्रिन्कलर्स' अर्थात पाण्याचे फवारे बसविण्यात आले आहेत. याद्वारे निर्धारीत वेळी मैदानात पाणी शिंपडले जाते. यामुळे मैदान अधिक क्रीडा पूरक होण्यास मदत होत आहे.
२. मैदानाखाली आढळून आली पाण्याची टाकी:- या मैदानाच्या समतलीकरणाचे काम सुरु असताना मैदानाच्या एका कोप-यात जमिनीखाली एक ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली आहे. विशेष म्हणजे या टाकीची नोंद सरकारी दफ्तरात किंवा महानगरपालिकेच्या कागदपत्रांमध्ये आढळून आली नाही. सुमारे सव्वालाख लीटर पाणी साठवण क्षमता असणा-या या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनांतर्गत (Rain Water Harvesting) पावसाचे पाणी साठविण्यासाठी केला जाणार आहे. हेच पाणी नंतर 'स्प्रिन्कलर्स' द्वारे मैदानावर शिंपडले जाणार आहे.
३. मैदानाच्या खाली वर्षा जल संचयन यंत्रणाः- मैदानात पडणारे पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी संपूर्ण मैदानाच्या खाली सुमारे १ ते दीड फुटावर वैशिष्ट्पूर्ण पद्धतीने सच्छिद्र पाईप बसविण्यात आले आहेत. या पाईपांवर बसविण्यात आलेल्या आच्छादनांमुळे केवळ पाणी सच्छिद्र पाईपामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर मैदानात झिरपणारे हे पावसाचे पाणी ६ इंची पाईपद्वारे ब्रिटिशकालीन पाणी साठवण टाकीमध्ये साठविण्यात येणार आहे. याच पाण्याचा उपयोग 'स्प्रिन्कलर्स' साठी करण्यात येणार आहे.
४. लाकडी उपकरणे असलेली खुली व्यायाम शाळा:- लोखंड किंवा पोलाद यासारख्या धातूंचा वापर करून तयार केलेली व्यायाम शाळेतील अनेक उपकरणे आपण बघितली आहेत. पण वरळीच्या जांबोरी मैदानात उभारलेली खुली व्यायामशाळा प्रथम दर्शनीच आपले लक्ष वेधून घेते. कारण या व्यायाम शाळेतील उपकरणे ही चक्क लाकडाची आहेत. याठिकाणी डंबेल्स, वेटलिफ्टिंग, पूल-अप्स आदी सर्व उपकरणे लाकडाची आहेत.
५. खुले योग केंद्र:- या मैदानालगत खुले योग केंद्र उभारण्यात येत असून याचे काम सध्या अंतिम टप्यात आहे. या योग केंद्रात एकावेळी सुमारे ३० व्यक्ती योगाभ्यास करु शकतील.
६. लवकरच सुरू होणार मल्लखांब सराव:- या मैदानात मल्लखांब या भारतीय खेळाचा सराव करण्यासाठी आवश्यक ते साहित्य लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
७. मल्टी-स्पोर्टस् रबरमॅट कोर्ट:- या मैदानात ५ हजार १०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचे मल्टी-स्पोर्टस् रबरमॅट कोर्ट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. चारही बाजुंनी जाळीचे आच्छादन असणा-या या स्वतंत्र क्रीडांगणात कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यासारख्या विविध क्रीडा प्रकारांचा सराव नियमितपणे होत आहे.
८. स्केटिंग ट्रॅक:- या मैदानात सुमारे ५० मीटर लांबीचा स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. सध्या दररोज सकाळी आणि सायंकाळी या ठिकाणी स्केटिंग या क्रीडा प्रकाराचा सराव करणारे खेळाडू दिसून येत आहेत.
९. जॉगिंग ट्रॅकः- परिसरातील नागरिकांना मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक घेणे सोईचे व्हावे, यासाठी या मैदानाच्या सभोवती १ हजार ३०० फुटांपेक्षा अधिक लांबीचा व १३ फूट रुंद असणारा प्रशस्त जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
१०. मैदानाच्या सभोवती जाळी:- मैदानात खेळल्या जात असलेल्या विविध क्रीडा प्रकारांना स्वतंत्र स्पेस मिळावी, या उद्देशाने मैदान व जॉगिंग ट्रॅक या दरम्यान जाळी बसविण्यात येत आहे. या जाळीमुळे मैदान खेळांदरम्यान वापरले जाणारे विविध प्रकारचे चेंडू मैदानाबाहेर जाण्यास देखील काही प्रमाणात प्रतिबंध होणार आहे.
११. आकर्षक एलईडी दिवे असलेले झोके (एलईडी स्विंग):- या मैदानात काही आकर्षक झोके बसविण्यात आले आहेत. या झोक्यांचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या अर्धपारदर्शक झोक्यांच्या आत रंगबिरंगी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे झोके सध्या परिसरातील लहान मुलांच्या आकर्षणाचे ठिकाण झाले आहे.
१२. एलईडी दिवे असलेल्या नंबर गेम:- आपल्या पारंपरिक आटापाट्या किंवा छप्पी या खेळाशी साधर्म्य साधणारा व विविधरंगी एलईडी दिवे असलेला नंबर गेम या ठिकाणी बसविण्यात आला आहे. हा खेळ खेळण्यासाठी रोज संध्याकाळी लहानग्यांची लगबग दिसून येत आहे.
१३. सूर्यास्तानंतर प्रकाशासाठी एलईडी दिव्यांचे वैशिष्ट्यपूर्ण खांब:- मैदान परिसरात सूर्यास्तानंतर पुरेसा प्रकाश असावा, या हेतूने मैदानाच्या सभोवती एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण सुमारे ४० खांब बसविण्यात आले आहेत. या खांबांमध्ये करण्यात आलेल्या आरशांच्या वैशिष्ट्यपूर्ण वापरामुळे प्रकाश परावर्तन साधले जाऊन मैदान उजळण्यास मदत होत आहे. तसेच या मैदानाच्या चारही कोप-यांवर ४ हायमास्ट यापूर्वीच बसविण्यात आले आहेत.
१४. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कट्टा:- ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आकाराचा कट्टा तयार करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकमेकांकडे बघून एकमेकांशी संवाद साधणे सुलभ व्हावे, या हेतुने या कट्टयांचे आकार अर्धगोलाकृती करण्यात येत आहेत.
१५. लहान मुलांसाठी खेळणी:- या मैदानालगत लवकरच घसरगुंडी, सिसॉफळी, फिरते चक्र, झोके इत्यादी खेळणी बसविण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी जमिनीवर रबरमॅट देखील टाकण्यात येणार आहे.
१६. व्ह्युवींग डेक सह खुले वाचनालय:- मैदानालगतच्या एका बाजूला खुले वाचनालय उभारण्यात येत आहे. या वाचनालयाच्या वरती व्ह्युवींग डेक देखील उभारण्यात येणार आहे.
१७. मैदानाच्या सभोवती क्रीडा शिल्पे:- या मैदानाच्या सभोवताली वैशिष्ट्यपूर्ण क्रीडाशिल्पे बसविण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भालाफेक, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारांची शिल्पे आकर्षिक पद्धतीने बसविण्यात आली आहेत.
१८. मैदानात हवा खेळती रहावी, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ग्रील:- मैदानात हवा मोकळी व खेळती रहावी, या उद्देशाने मैदानाच्या सभोवतील संरक्षण भिंत बांधण्याऐवजी ग्रील बसविण्यात आली आहे. यामुळे मैदानातील हवा खेळती राहण्यास मदत होत आहे.
१९. वैशिष्ट्यपूर्ण इल्युजनरी पेंटिंग व प्रवेशद्वार:- मैदानाच्या प्रवेशद्वारालगत विविध खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण व अभिनव ‘इल्युजनरी पेंटिंग’ चितारण्यात आली आहेत. या पेंटिंगचे वैशिष्ट्य म्हणजे खांबांमुळे झाकला जाणारा मैदानाचा भाग खांबांवरच चितारण्यात आला आहे. यामुळे एका विशिष्ट कोनातून बघितल्यानंतर खांबांवर चितारण्यात आलेले चित्र आणि मैदानातील प्रत्यक्ष दृष्य, या दोन्ही बाबींचा अभिनव संगम भासमान पद्धतीने साधला जाऊन एक आगळेवेगळे चित्र दिसून येते. या ‘इल्युजनरी पेंटिंग’ सोबत सेल्फी काढण्यासाठी सध्या तरुणांची लगबग दिसून येत आहे. त्याचबरोबर मैदानाचे प्रवेशद्वार देखील आकर्षक व कलात्मकरित्या उभारण्यात आले आहे.
२०. पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहांची सुविधाः- या मैदानात खेळावयास येणा-या खेळाडुंसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी, या उद्देशाने अस्तित्वात असलेले प्याऊ (पाणपोई) सुधारित करुन लवकरच सुरु करण्यात येत आहे. त्याचबरोबर जुन्या प्रसाधनगृहाचे अद्ययावतीकरण लवकरच करण्यात येणार आहे.
२१. मैदानातील अतिक्रमणे हटविलीः- या मैदानालगत गेल्या काही वर्षात अतिक्रमण उद्भवली होती. गेल्या ४ महिन्यात झालेल्या सुधारणा कामांदरम्यान ही अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. यामुळे सुमारे १५ हजार चौरस फुटांची जागा मोकळी होण्यास मदत झाली आहे.
(जसंवि/ ५७६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा