बसमधून प्रवास करत असताना बॅगेतून मंगळसूत्र चोरले
मुंबई, दादासाहेब येंधे : तक्रारदार श्रीमती रोहिणी चंद्रकांत आखाडे या घाटकोपर ते कांदिवली दरम्यान दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी बस मधून कामानिमित्त प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याबाबत त्यांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध समता नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४५/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील, पो. हा. सावंत, पो.ना. अकबर, पो.शि. वारंग, पो. शि. राठोड, मपोशी. पाटणकर, मुलानी व ननावरे यांनी तक्रारदार यांनी ज्या बसने प्रवास केला होता त्या बसच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता ठाकूर कॉम्प्लेक्स बस स्टॉप याठिकाणी काही महिला उतरून रिक्षा पकडून गोरेगावच्या दिशेने जात असताना दिसून आल्या. संशयित महिला रिक्षाने प्रवास करत असलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून रिक्षा क्रमांक प्राप्त करण्यात आला. प्राप्त रिक्षा क्रमांकाच्या चालकांकडून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सदर संशयित महिलांना भांडुप येथे सोडले असल्याचे सांगितले. माहितीच्या आधारे भांडुप येथील ज्या परिसरामध्ये महिलांना सोडण्यात आले त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करून सदर महिलांचे फोटो प्राप्त करण्यात आले.
या फोटोंच्या आधारे गुप्त बातमीदाराकडून त्यांची माहिती प्राप्त करून दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी तीन महिलांना १) अनुसया चंद्रकांत गायकवाड (वय ५५ वर्षे), २) मराक्का उर्फ मारूबाई लक्ष्मण गायकवाड (वय ५० वर्षे), ३) बेबी रामू गायकवाड (वय ५२ वर्ष) या राहणार सर्व भगवानदास चाळ, काजू टेकडी, मंगतराम पेट्रोल पंपच्या मागे, भांडुप पश्चिम यांना भांडुप पोलीस ठाणेच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यांना अटक करण्यात आले. त्या अटक केलेल्या महिलांकडून गुन्ह्यातील चोरी करण्यात आलेले ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपयेचे हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती समता नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा