बंद शोरूममधून लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजिटल, किंग्स इलेक्ट्रॉनिक शोरूममधून डिस्प्लेसाठी ठेवलेला लॅपटॉप चोरी करणाऱ्या राजस्थान येथील धर्मसिंह चौथीलाल मीना (३८) आणि अशिषकुमार रामहरी मीना (२६) या दोघांना नवी मुंबई गुन्हे शाखा पक्षाने अटक केली. त्यांच्याकडून एकूण आठ लॅपटॉप तसेच गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या चौकशीत ७ लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीचा ऐवज देखील हस्तगत करण्यात आला आहे.
नवी मुंबई, मुंबई शहर व ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात असलेल्या क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजिटल, किंग्स अशा इलेक्ट्रॉनिक शोरूममधून डिस्प्लेसाठी ठेवलेल्या लॅपटॉपची चोरी होत असल्याचा प्रकार वाढले होते. एकाच दिवशी १७ ऑगस्ट २०१९ रोजी नवी मुंबई आयुक्तालयातून काही तासांच्या अंतरामध्ये पनवेल शहरातील विजय सेल्स जवळ सीबीडी बेलापूर येथील क्रोमा एलेक्ट्रोनिक शोरूम मधील डेमोसाठी ठेवलेले तीन लॅपटॉप चोरी झाल्याबाबत पनवेल शहर तसेच सीबीडी बेलापूर येथे गुन्हे नोंद झाले होते. तसेच दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी बोरवली पोलीस ठाणे मुंबईच्या हद्दीत वेगवेगळ्या तीन इलेक्ट्रॉनिक शोरूममधून तीन लॅपटॉप व चितळसर मानपाडा पोलीस ठाणे शहर हद्दीत एक लॅपटॉप चोरी झाल्याबद्दल एकूण चार गुन्हे नोंदवले गेले होते. तसेच नवी दिल्लीतील निर्माण विहार येथून एक लॅपटॉप चोरी झाल्याबद्दलचा गुन्हा नोंद आहे. असे एकूण ७ लॅपटॉप चोरी झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते.
सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींचा तपास केला असता नमुदचे गुन्हे आरोपींनी केले असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी राजस्थान येथून मोटार कारने नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नवी दिल्ली या शहरात जाऊन तिथे असलेल्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ग्राहक म्हणून लॅपटॉप खरेदी करण्यासाठी जात. शोरूममध्ये डिस्प्लेसाठी ठेवण्यात आलेला लॅपटॉपपैकी ज्या लॅपटॉपला बीप पिन लावलेली नसेल असे लॅपटॉप चोरी करून तेथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पसार होत होते. त्यांना पोलिसांनी वाशी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा