अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या या ८ हजार ९१५ रुग्ण शय्या क्षमतेच्या रुग्णालयांसाठी ४ हजार ६०० पेक्षा अधिक मनुष्यबळ कार्यरत
गेल्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेल्या या तात्पुरत्या रुग्णालयांना सरासरी १ वर्ष पूर्ण
'कोविड -
१९' या
संसर्गजन्य साथरोगाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका
सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. सन २०२० मध्ये कोविडच्या सुरुवातीच्या
काळात कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात 'बेड' मिळण्यात अडचणी येत असल्याने
रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. मात्र, अत्यंत कमी कालावधीत नवीन
रुग्णालय बांधून रुग्ण शय्या अर्थात बेडची संख्या वाढविणे अशक्यच होते. ही बाब
लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध असलेल्या जागांचा उपयोग
करून तात्पुरत्या स्वरूपातील कोविड समर्पित भव्य रुग्णालये म्हणजेच 'जंबो कोविड रुग्णालय' उभारण्याचा निर्णय घेतला.
यानुसार पहिले रुग्णालय वरळी परिसरातील राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये
(एन.एस.सी.आय.) कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, भायखळा, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी
देखील तात्पुरत्या स्वरूपातील कोविड समर्पित रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली.
या एकूण ८ हजार ९१५ खाटांच्या या ६ रुग्णालयांमध्ये आतापर्यंत तब्बल ८९ हजार २०६
रुग्णांवर परिणामकारक वैद्यकीय उपचार करण्यात आले. यासाठी १ हजार १५७ डॉक्टर्स, १ हजार १३७ परिचारिका, १ हजार १८० वॉर्डबॉय यांच्यासह
साधारणपणे ४ हजार ६५८ इतके मनुष्यबळ कार्यरत आहे.
महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात या जम्बो कोविड रुग्णालयांचे नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने दैनंदिन आकडेवारीचे संगणकीय व ऑनलाईन पद्धतीने संकलन व विश्लेषण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असून 'जम्बो कोविड रुग्णालय' उभारण्याची व कार्यान्वित करण्याची कार्यवाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे करण्यात येत आहे. तर या रुग्णालयांचे दैनंदिन नियोजन व व्यवस्थापन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
मुंबईतील विविध ६ ठिकाणी कार्यरत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ 'जम्बो कोविड रुग्णालयांची महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे:-
मुंबईतील
शहर भागातील वरळी परिसरात असणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या आवारात मुंबईतील
पहिले 'जम्बो
कोविड रुग्णालय'
हे
दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले. या ५९७ रुग्ण शय्या
(बेड) क्षमतेच्या रुग्णालयात आतापर्यंत ९ हजार ८१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या
ठिकाणी असणाऱ्या ५९७ बेडमध्ये १३० ऑक्सिजन, ३३ अतिदक्षता, कोविड बाधित कर्करोग
रुग्णांसाठी २० बेड ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी साधारणपणे ३९० कर्मचारी
कार्यरत असून यामध्ये ६५ डॉक्टर्स, १५० परिचारिका, १२० वॉर्डबॉय यांच्यासह सुरक्षा रक्षक
व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णालयात कोविड होऊन गेलेल्या रुग्णांसाठी 'रिहॅबिलिटेशन केंद्र' देखील कार्यरत आहे.
मुंबई
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे त्यांच्या वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील
एका मैदानावर उभारण्यात आलेले 'जंबो कोविड रुग्णालय' महानगरपालिकेकडे हस्तांतरित
करण्यात आल्यानंतर दिनांक १८ मे २०२० पासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले. अत्यंत
अल्पावधीत व विक्रमी वेळेत उभारण्यात आलेल्या या २ हजार ३२८ बेडच्या रुग्णालयात
आतापर्यंत २४ हजार १४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या ठिकाणी असणाऱ्या २ हजार
३२८ बेडमध्ये ६७ व्हेंटिलेटर, १०८ आय.सी.यू. आणि ८९६ ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. विशेष
म्हणजे डायलिसिसची नियमित गरज असणाऱ्या कोविड बाधित रुग्णांसाठी या ठिकाणी १२ 'डायलिसिस युनिट' कार्यरत आहेत. या रुग्णालयात
रुग्णसेवेसाठी साधारणपणे १ हजार ३९९ कर्मचारी कार्यरत असून यामध्ये ३९५ डॉक्टर्स, २९९ परिचारिका, ३०५ वॉर्डबॉय यांच्यासह सुरक्षा
रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
केंद्र देखील कार्यरत असून आजवर २ लाख ४३ हजार ५०० लशीच्या मात्रा देण्यात आल्या
आहेत. या रुग्णालयाचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे इथे दाखल होणाऱ्या रुग्णांना
रुग्णालयात असताना वाचनाचा आनंद व विरंगुळा मिळावा, म्हणून एक ग्रंथालय देखील आहे.
गोरेगाव
परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्राच्या आवारात कार्यान्वित करण्यात आलेले जम्बो
कोविड रुग्णालय हे दिनांक २ जून २०२० पासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू आहे. २ हजार
२२१ खाटांच्या या रुग्णालयात वर्षभरात २१ हजार ६३७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार
क्रमानुसार योग्य ते उपचार करण्यात आले. या ठिकाणी असणाऱ्या २ हजार २२१ बेडमध्ये
१२३ व्हेंटिलेटर,
२०६
आय.सी.यू. आणि ७३७ ऑक्सिजन बेड्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे डायलिसिसची नियमित
गरज असणाऱ्या कोविड बाधित रुग्णांसाठी या ठिकाणी १० 'डायलिसिस युनिट' कार्यरत आहेत. या रुग्णालयात
रुग्णसेवेसाठी साधारणपणे १ हजार ८२६ कर्मचारी कार्यरत असून यामध्ये ४८६ डॉक्टर्स, ४२३ परिचारिका, ५७१ वॉर्डबॉय यांच्यासह सुरक्षा
रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
केंद्र देखील कार्यरत असून आजवर २ लाख ११ हजार १६५ लशीच्या मात्रा देण्यात आल्या
आहेत.
भायखळा
परिसरातील रिचर्डसन आणि क्रूडास या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनीच्या आवारात
कार्यान्वित करण्यात आलेले जम्बो कोविड रुग्णालय हे दिनांक १ जुलै २०२० पासून
मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले. १ हजार बेड्सच्या या रुग्णालयात वर्षभरात ११ हजार
२६१ रुग्णांवर वैद्यकीय उपचार क्रमानुसार योग्य ते उपचार करण्यात आले. या
रुग्णालयात रुग्णसेवेसाठी साधारणपणे ८७ कर्मचारी कार्यरत असून यामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह सुरक्षा
रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पूर्व
उपनगरातील मुलुंड परिसरात असलेल्या रिचर्डसन व क्रुडास या केंद्र सरकारच्या
अखत्यारीतील कंपनीच्या जागेवर कार्यरत असलेले हे जम्बो कोविड रुग्णालय दिनांक १६
जुलै २०२० पासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले अहे. १ हजार ७०८ खाटांच्या या
रुग्णालयात साधारणपणे गेल्या वर्षभरात १२ हजार ९२७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार
क्रमानुसार योग्य ते उपचार करण्यात आले. या ठिकाणी असणाऱ्या १ हजार ७०८ बेडमध्ये
३८ व्हेंटिलेटर सह ५८ आय.सी.यू. आणि ९६९ ऑक्सिजन बेड्सचा समावेश आहे. या
रुग्णालयात रुग्णसेवेसाठी साधारणपणे ४३६ कर्मचारी कार्यरत असून यामध्ये १०३
डॉक्टर्स, १०५
परिचारिका, ९०
वॉर्डबॉय यांच्यासह सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णालयात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र देखील कार्यरत असून आजवर ६३ हजार ८२८ लशीच्या
मात्रा देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात ३०० इतक्या संख्येने 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स'ही उपलब्ध आहेत.
बृहन्मुंबई
महानगरपालिका क्षेत्रातील पश्चिम उपनगरात असणाऱ्या दहिसर मध्ये तात्पुरत्या
स्वरूपात उभारण्यात आलेले 'जम्बो कोविड समर्पित रुग्णालय' हे दिनांक २७ जुलै २०२० पासून
मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले. १ हजार ६१ बेड्सच्या या रुग्णालयात आतापर्यंत १०
हजार १५१ रुग्णांवर वैद्यकीय उपचार क्रमानुसार योग्य ते उपचार करण्यात आले. या
ठिकाणी असणाऱ्या १ हजार ६१ बेड्समध्ये १६ व्हेंटिलेटर, १०० आय.सी.यू. आणि ६७२ ऑक्सिजन
बेडचा समावेश आहे. या रुग्णालयात रुग्णसेवेसाठी साधारणपणे ५२० कर्मचारी कार्यरत
असून यामध्ये १०० डॉक्टर्स, १५० परिचारिका, ६० वॉर्डबॉय यांच्यासह सुरक्षा रक्षक
व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र
देखील कार्यरत असून आजवर १ लाख ४५ हजार ८१५ लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी या ठिकाणी दूरध्वनी
आधारित 'पोस्ट
कोविड' मार्गदर्शन
केंद्र कार्यरत आहे.
( जसंवि/१४२)

0 टिप्पण्या