नवी मुंबई वाहतुक पोलीस विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा जनजागृतीकरिता आयोजित प्रदर्शनीय क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रिकेट संघाने नवी मुंबई पोलीस क्रिकेट संघावर 35 धावांनी मात करीत अंतिम विजेतेपद संपादन केले. महानगरपालिकेच्या विजयी क्रिकेट संघाचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले उपस्थित होत्या.
नवी मुंबई पोलीस, नवी मुंबई वाहतुक पोलीस, नवी मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग नवी मुंबई, प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल, वकील, लोकप्रतिनिधी, पत्रकार अशा आठ संघांमध्ये राजीव गांधी क्रीडासंकुल, सेक्टर 3, सी.बी.डी. बेलापूर येथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या. क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत विविध संघांसोबत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये विजयश्री संपादन केली. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलीस संघातून नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह स्वत: सहभागी झाले होते. त्यांनी महानगरपालिकेच्या राजीव गांधी क्रीडा संकुलातील व्यवस्थेचे कौतुक केले.
4 मर्यादित षटकांच्या अंतिम सामन्यात नवी मुंबई महानगरपालिका संघाने 1 बाद 57 धावा करून 58 धावांचे आव्हान नवी मुंबई पोलीस संघासमोर ठेवले होते. त्यामध्ये नवी मुंबई पोलीस संघाने 4 षटकांत 4 बाद 22 धावांपर्यंत मजल मारली आणि महानगरपालिकेचा संघ 35 धावांनी विजयी झाला. महानगरपालिका संघातील यतीन भोईर यांनी नाबाद 37 धावा करीत महत्वाची कामगिरी बजावली. विजेंद्र कोळी यांनी 11 धावा करीत त्यांना चांगली साथ दिली. दशरथ भोईर यांनी 2 तसेच उदय तांडेल यांनी 1 गडी बाद करीत अचूक मारा करून नवी मुंबई पोलीस संघाला रोखून धरले. संतोष मळेकर यांनी 2 अप्रतिम झेल टिपत महापालिका संघासाठी महत्वाचे योगदान दिले. नवी मुंबई पोलीस संघातील अमित वाडकर यांनी एका उत्तुंग षटकारासह 10 धावा करीत उत्तम कामगिरी केली.
वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. पुरूषोत्तम कराड यांचेसह सामुहिकरित्या वाहतुक सुरक्षेची शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा चषक पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते, नवी मुंबई महानगरपालिका संघाचे कर्णधार गिरीश चावरे तसेच क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, उपकर्णधार संतोष मळेकर, गणेश पाटील, उदय तांडेल, नतकेश पाटील, यतीन भोईर, दशरथ भोईर, विजेंद्र कोळी, सुनील जोशी, वैभव म्हात्रे, वैभव झुंजारे या खेळाडूंनी स्विकारला.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा