बहुपर्यायी स्टॉल सुरू करण्याची परवानगी
मुंबई, दादासाहेब येंधे : रेल्वे स्थानकातील बूक स्टॉल लवकरच बंद होणार आहेत. लॉक डाऊन काळातील नुकसान भरपाई म्हणून स्थानकातील बूक स्टॉल चालकांनी अन्य उत्पादन विक्रीसाठी परवानगी मागितली होती. रेल्वे मंडळाने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता बुक स्टॉलच्या जागी बिस्किटं, अन्य सीलबंद खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, घाटकोपर आणि अन्य रेल्वेस्थानकांवर 'व्हीलर' चे बूक स्टॉल होते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे स्टॉल जणू स्थानकांची ओळख बनले होते. स्थानकातील प्रमुख जागेवर एकमेव स्टॉल असल्याने अनेकांच्या भेटीगाठीचे ठिकाणही हेच होते. लॉक डाऊनच्या काळात पुस्तक विक्री पूर्णपणे ठप्प झाली. अनलॉकमध्येही हवा तसा प्रतिसाद पुस्तकांना मिळाला नाही. सध्या ई- पुस्तके उपलब्ध झाल्याने विक्री रोडावली आहे. पुस्तक विक्रीतून महिन्याचा खर्चही निघत नव्हता. यामुळे केवळ पुस्तक विक्री हा नियम शिथिल करून बहुपर्यायी स्टॉल सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती असे एका स्टॉल चालकाने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा