भविष्यात २०२२ मध्ये मुंबईमध्ये काँग्रेसचाच महापौर असेल, काँग्रेस शिवाय अन्य कुठल्याही पक्षाचा महापौर होणे अशक्य - भाई जगताप
मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये मला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड ऊर्जा त्यांची स्फूर्ती दिसत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते ही काँग्रेसची खरी ताकद आहे आणि या कार्यकर्त्यांनी जर या वर्षभरात महापालिका निवडणुकांसाठी आपली अशीच ताकद लावली तर २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर मुंबईमध्ये कॉंग्रेसचाच महापौर असेल, काँग्रेस शिवाय अन्य कुठल्याही पक्षाचा महापौर होणे अशक्य आहे, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ईशान्य मुंबई जिल्ह्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केला. या मेळाव्यात त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, AICC सचिव सोनल पटेल आणि जेनेट डिसुझा, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष प्रणिल नायर आणि काँग्रेसचे सर्व स्थानिक आजी-माजी नगरसेवक, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई जगताप पुढे म्हणाले की, काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेसचा पाया आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही नेते आहोत. मी सुद्धा आधी एक कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. म्हणूनच मी या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून मी त्यांना आज आश्वासन देत आहे की, २२७ वॉर्ड मध्ये निवडणूक लढताना काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधलाच एक असेल. कोणी कितीही सांगितले, कोणीही कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी वॉर्ड मध्ये बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे आश्वासन भाई जगताप यांनी दिले. तसेच ५०० चौरस फुटांपर्यंत च्या घरांवरचा प्रॉपर्टी टॅक्स हा संपूर्णपणे माफ करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच, काँग्रेसच्या २९ नगरसेवकांसोबत मुंबईकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न, मग ते स्वच्छ पाण्या संदर्भात असोत, किंवा शौचालयाच्या दुरावस्थे संदर्भात असोत, हे सर्व प्रश्न घेऊन मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेणार, तसेच नुसते निवेदन देऊन गप्प बसणार नाही, तर त्यावर कृती करायला त्यांना भाग पाडणार असे आश्वासन भाई जगताप यांनी दिले.
मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यावेळेस बोलताना म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार हे देशातील सर्वसामान्य नागरिक, ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांची पिळवणूक करत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज ८० ते ९० रुपये लिटरच्या घरात आहेत व दिवसेंदिवस ते वाढतच आहेत आणि असेच जर सुरू राहील एक दिवस ते १०० रुपयांच्यावर जातील. कच्च्या तेलाचे दर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले आहेत, तरी सुद्धा भाजप सरकारने इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. घरगुती गॅस जो काँग्रेसच्या काळात ४५० रुपयांना मिळायचा तो आता ७५० रुपये प्रति सिलेंडर मिळत आहे. आता कुठे गेल्या स्मृती इराणी, कुठे गेले अनुपम खेर आणि बाबा रामदेव? बाबा रामदेव म्हणाले होते की भाजपची सत्ता आल्यावर ३० रुपये लिटर होईल. पेट्रोल आणि डिझेल सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवर प्रचंड प्रमाणात एक्साईज ड्युटी भरावी लागत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा परिणाम इतर सर्व गोष्टींवर होत आहे व महागाई वाढत आहे. काँग्रेसची अशी मागणी आहे कि जर भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व इतर पेट्रोलजन्य पदार्थ जर GST अंतर्गत आणले असते. तर एवढी एक्साईज ड्युटी लागणार नाही, ती कमी होईल आणि पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी होतील आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल. हे सर्व जनतेचे पैसे आहेत, याकडेही चरणसिंग सप्रा यांनी लक्ष वेधले.
ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या समस्यांवर प्रकाश टाकताना चरणसिंग सप्रा म्हणाले की, ईशान्य मुंबई उपनगर नेहमीच शासनाकडून दुर्लक्षित राहिलेले आहे. या विभागात राजावाडी रुग्णालय सोडल्यास कोणतेही पालिकेचे रुग्णालय नाही, सरकारी पॅथॉलॉजी लॅब आणि ट्रॉमा केयर रुग्णालय नाही. देवनारमध्ये आणि भांडुपमध्ये डम्पिंग ग्राउंड आहे. संपूर्ण मुंबईचा कचरा इथे आणून टाकला जातो. सर्व प्रकारच्या समस्यांनी या ईशान्य मुंबई जिल्ह्याला वेढलेले आहे, आमची अशी मागणी आहे की या विभाग पश्चिम उपनगराप्रमाणे ट्रॉमा केयर रुग्णालय सुरु करावे, तसेच महापालिकेची सिटी स्कॅन व पॅथॉलॉजि लॅब सुरु करण्यात यावी. या विभागातील लोकांना अशुद्ध पिण्याचे पाणी, शौचालयाची दुरावस्था अशा अनेक समस्यांनी वेढलेले आहे. मुंबई महानगरपालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर त्या सोडवाव्यात.
ईशान्य मुंबईचा आजपर्यंत फक्त मतांसाठी वापर करण्यात आला आहे. या विभागात काँग्रेसचा खासदार नाही आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या विभागामध्ये लोकसभा निवडणुकीत खासदारकीसाठी काँग्रेसचा उमेदवार नव्हता. माझी अशी मागणी आहे की, ईशान्य मुंबई जिल्ह्याचा पुढचा खासदारकीचा उमेदवार हा काँग्रेसचा असावा, मागच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इकडे होता. त्यामुळे यावेळेस काँगेसला हि जागा मिळावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा