स्वतःवर बंधने घालून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दादासाहेब येंधे : 'कोरोनाची चौथी लाट आली असून सावधानता बाळगा अद्यापही ३० टक्के लोक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे मास्कलाच शस्त्र समजून सावधानता बाळगा. पुन्हा लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी लावण्याच्या सूचना मला केल्या जात आहेत. पण मी तसे करणार नाही. अर्थात, ती वेळ येऊ द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे स्वतःवर बंधने लादून घ्या', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना म्हटले. मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटावर पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. युरोप आणि इंग्लंडमध्ये आजपासून कडक लॉक डाऊन सुरू झाला आहे. कोरोनाची चौथी लाट आली आहे. त्यामुळे सावध राहा. राज्यात कोरोनावर नियंत्रण आहे. ७० टक्के लोक मास्क लावून फिरताना दिसतात. ही नक्कीच चांगली बाब आहे. पण, अजूनही ३० टक्के लोक मास्क वापरत नाहीत. बंधने पाळत नाहीत. तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका. आपल्या आप्तेष्टांच्या जीवाशी खेळू नका. आनंदाला थोडे दिवस बंधन घाला. इलाजापेक्षा काळजी घ्या. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले. कोरोनावर लस आली तरीही मास्क वापरणे बंधनकारक राहणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या