आर्थिक गुन्हे शाखेच्या नियंत्रण पथकाची धडक कारवाई
मुंबई दादासाहेब येंधे : भंगारातील पत्र्याच्या डब्यात अशुद्ध खाद्यतेल भरून ते तेल दुकानांमध्ये विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या शिवडीतील गोदामावर आर्थिक गुन्हे शाखेच्या नियंत्रण पथकाने (१५ डिसेंबर २०२० रोजी) धडक कारवाई केली. त्या खाद्यतेलाच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी जवळपास पाच हजार किलो खाद्यतेल जप्त केले असून गोदाम मालकाला बेडया ठोकल्या आहेत.
शिवडीच्या दारूखाना परिसरात तेलाचे गोदाम असून तेथे भंगारातील पत्र्याचे डबे अशुद्ध पाण्याने धुऊन त्यात तेल भरायचे व ते तेल शहरातील विविध दुकानांमध्ये विकले जात असल्याची माहिती नियंत्रण युनिटचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी एपीआय ओम वेदांत तसेच महेंद्र जाधव, गणेश डोईफोडे, महेंद्र दरेकर, संतोष पवार, अमित वलेकर, विशाल यादव, महेश कोळी, दिनेश आंगवळकर या पथकाने एफडीआय पथकाच्या मदतीने त्या गोदामावर छापा मारला. त्यावेळी तेथे तीन कामगार भंगारातील पत्र्याचे डबे अशुद्ध पाण्याने धुऊन त्यात खाद्यतेल भरत असल्याचे आढळून आले.
या कारखान्यातून मोहरी, शेंगदाणे, पामोलीन, रिफाइन अशा वेगवेगळ्या प्रकारचे तेल जप्त केले आहे.
एफडीएच्या पथकाने त्या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून पोलिसांनी तब्बल पाच हजार किलो खाद्यतेल जप्त करून एकप्रकारे नागरिकांचा जीव वाचवला आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.


0 टिप्पण्या