नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमधील कोव्हीड टेस्टींग शिबीरांसोबत आता 2 टेस्टींग केंद्रेही कार्यान्वित - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

demo-image

नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमधील कोव्हीड टेस्टींग शिबीरांसोबत आता 2 टेस्टींग केंद्रेही कार्यान्वित

नवी मुंबई  एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमधील कोव्हीड टेस्टींग शिबीरांसोबत आता २ टेस्टींग केंद्रेही कार्यान्वित

दादासाहेब येंधे : 

        टाळेबंदीनंतर शासनाने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत नागरी जनजीवन व नियमित व्यवहार सुरळीत सुरू होण्याच्या दृष्टीने काही बंधने पाळून टप्प्याटप्प्याने विविध गोष्टी खुल्या केल्या. त्यामध्ये एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योग व्यवसायही सुरू झाले. या विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आसपासच्या शहरांतून मोठ्या संख्येने दररोज अनेक व्यक्ती ये-जा करीत असतात.
      त्यामुळे एकप्रकारे कोरोना प्रसाराच्या दृष्टीने एम.आय.डी.सी. क्षेत्र हे जोखमीचे क्षेत्र असल्याचे लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सोसायटी, वसाहतींप्रमाणेच येथील कंपन्यांमध्ये जाऊन विशेष कोव्हीड तपासणी मोहीमा राबविण्याचे निश्चित केले. उपआयुक्त श्री. राजेश कानडे यांच्या नियंत्रणाखाली डॉ. सचिन नेमाने यांची समन्वयक म्हणून नेमणूक करीत ५ वैद्यकीय पथके तयार करण्यात आली. एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी श्री. सतिश बागल यांची इन्सिडेन्ट कमान्डर म्हणून नेमणूक करण्यात आली आणि 28 सप्टेंबरपासून एमआयडीसीच्या नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयापासूनच विशेष कोव्हीड तपासणी शिबिरे राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
      ५ ऑक्टोबर पर्यंत झायडस, लुब्रिझॉल, मिलिनियम बिझनेस पार्क, माझदा कलर्स, अमाइन्स अँड प्लास्टिसायझर्स लि., नेरोलॅर पेन्ट्स, अपार इंटस्ट्रिज, पार्कर, इग्लू अशा विविध १३ कंपन्यामध्ये टेस्टिंग शिबिरे राबविण्यात आली असून १३३३ कर्मचा-यांचे टेस्टींग करण्यात आलेले आहे. त्यामधील ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या लक्षणांनुसार त्यांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील किमान २४ निकटवर्तीयांचीही तपासणी करण्यात आलेली आहे.
      एमआयडीसी कार्यालयांमार्फत कंपन्यांमधील तपासण्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून त्यानुसार महानगरपालिकेची तपासणी पथके विविध कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. याकरिता मोबाईल टेस्टींग व्हॅनही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
      याशिवाय अधिकची सुविधा म्हणून एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कंपन्यांच्या दोन महत्वाच्या संस्था ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असो. (टीबीआयए ) आणि टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रिज असो. (टीएमआयए) यांच्या रबाले येथील कार्यालयांमध्ये स्वतंत्र कोव्हीड १९ टेस्टींग सेंटर आजपासून सुरू करण्यात आलेली आहेत. या दोन्ही ठिकाणी अँटिजेन व आटी-पीसीआर अशा दोन्ही टेस्ट केल्या जाणार आहेत. आज या दोन्ही केंद्रांमधील टेस्टींगची कार्यवाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री.डी.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली. यावेळी टीबीआयए चे पदाधिकारी श्री. मंगेश ब्रह्मे व टीआयएमए चे पदाधिकारी श्री. गोपी उपस्थित होते. कमीत कमी वेळेत व सुलभपणे टेस्टींग व्हावे याकरिता ही एका ठिकाणी स्थायिक दोन केंद्रे स्थापन करण्यात आली असून याठिकाणीही कंपन्यांमधील कामगार येऊन टेस्टींग करण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.
      टीबीआयए कार्यालयात आज ६९ अँटिजेन व १० आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये ३ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तसेच टीएमआयए कार्यालयात आज ६३ अँटिजेन व ९ आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्येही ३ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. ॲटिजेन टेस्टचा अहवाल अर्ध्या तासात प्राप्त होत असल्याने त्यामध्ये पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त रूग्णांचे लगेच विलगीकरण करण्यात आले व त्यांच्या निकटवर्तीयांची माहिती घेण्यात आली असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. 
      यापुढील काळात दररोज विविध कंपन्यांमध्ये जाऊन तसेच या दोन केंद्रांठिकाणी अँटिजेन व आरटी-पीसीआर टेस्टींग केले जाणार असून सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी याचा लाभ घ्यावा असे सूचित करतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कंपन्यांमध्ये सर्व सुरक्षा साधनांची कर्मचा-यांना उपलब्धता करून द्यावी तसेच कर्मचा-यांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वारंवार हात धुणे या नियमांचा अंगिकार करून आपली व आपल्या सहका-यांची आरोग्य सुरक्षा जपावी असे आवाहन केले आहे.



DSC_0031+%25281%2529

DSC_0087





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *