ना ढोल, ना ताशे शांततेत विसर्जन
भक्तांचा कोरोनामुळे हिरमोड
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईच्या लालबाग परिसरात प्रसिद्ध असलेल्या रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या लंबोदराला आज "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर.." या अशा गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. तत्पूर्वी मंडळाचे विश्वस्त मधु चव्हाण यांनी हे कोरोनाचे संकट लंबोदरा लवकर दूर कर... असे गाऱ्हाणे घालून परंपरेप्रमाणे बैलगाडीवर बाप्पाला विराजमान केले.
दरवर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनाला लालबागमध्ये मोठी गर्दी असते. बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो. पण, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मिरवणुका रद्द करण्यात आल्यामुळे लाडक्या लंबोदराची मिरवणूकही मंडळाने रद्द केली होती. त्यामुळे भक्तांना, कार्यकर्त्यांना आज चुकल्यासारखं वाटत होतं.
राज्य सरकारने, पोलिसांनी आखून दिलेल्या नियमांप्रमाणे मास्क लावून, सामाजिक अंतराचे भान राखत मोजक्याच कार्यकर्त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे विसर्जन लालबाग येथील महापालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले, अशी माहिती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सत्यवान नर यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या