Ticker

6/recent/ticker-posts

हॉटेलचे बिल देण्यावरून हत्या; २४ तासांत आरोपी गजाआड

मुंबई, दादासाहेब येंधे : गोरेगाव येथील प्रेमनगर परिसरात सलमान हॉटेलसमोर झालेल्या तरुणाच्या हत्येचा गोरेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत अजय मुन्नी उपाध्याय (वय, वर्षे ३९) आणि विकास देवराज पासवान (वय, वर्षे २३) अशा दोघांना अटक केली आहे. अजीज मोहम्मद अतिक खान (वय, वर्षे ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.


११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर परिसरातील सलमान हॉटेलसमोर एका इसमाला मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला होता. तेथील काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले होते. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे, रात्रपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक पेचे, बीट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड तसेच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मृताचा भाऊ हबीब मोहम्मद अतिक खान याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अजीज खान हा सलमान हॉटेलचा मालक दानिश खान याला जेवणाचे पूर्ण बिल देण्यास सांगत होता. याच कारणावरून दोन अनोळखी व्यक्तींनी अजीज खान याच्याशी वाद घातला. "तेरा क्या संबंध है, तू हमको जानता नहीं है, तेरेको देख लेंगे," असे म्हणत आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी हाताने तसेच फळे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी बॉक्सच्या पट्ट्याने अजीज खान याच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

पोलीस उपआयुक्त, उत्तर परिमंडळ-१ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदारांची सहा तपास पथके तयार केली होती. तपासादरम्यान आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर १३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.४३ वाजता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. अजय मुन्नी उपाध्याय(वय ३९ वर्षे) व विकास देवराज पासवान (वय, २३ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

सदरची उत्कृष्ट कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त उत्तर परिमंडळ-१ पुरुषोत्तम कराड आणि सहायक पोलीस आयुक्त गोरेगाव विभाग सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे, पोलीस निरीक्षक उमेश दांडेले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) साई पेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश चौगुले, राठोड, दीपक खारडे, योगेश रांधे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कांबळे, आकाश काळे, सत्यपाल बोधे, विशाल दौंडकर, अक्षय मांडळे, रोहन कोलारे, सूर्यभान घोळप, गजानन हरबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार प्रदीप कुलट, विनोद चव्हाण, दिनकर तावडे, दत्तात्रय बागुल, सचिन दळवी, कल्पेश नेहरे, भरत कदम, पोलीस शिपाई सौरभ चव्हाण, प्रज्वल मोहिते, भूपेंद्र सालकर, विशाल दानी, सतीश पाटील, सचिन मेश्राज आणि सुहास शिंदे यांनी तपासात उल्लेखनीय कामगिरी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या