Ticker

6/recent/ticker-posts

पैशाऐवजी कागदाचे बोळे बॅगेत भरून नोकरानेच केली फसवणूक

मुंबई, दादासाहेब येंधे :  मालकाने विश्वासाने दिलेली १ कोटी २० लाख रुपयांची मोठी रक्कम लंपास करून फसवणूक करणाऱ्या नोकराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पायधुनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे राजस्थान मध्ये जाऊन या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या भावाला अटक केली असून, त्याच्याकडून १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात यश आले आहे.


तक्रारदार यांनी ८ ऑगस्ट रोजी त्यांचा नोकर पीरसिंह देवडा याच्याकडे दुसऱ्या कार्यालयातून १ कोटी २० लाख रुपये रोख आणण्यासाठी सोपवले होते. मात्र, पीरसिंह देवडा याने तक्रारदाराचा विश्वासघात केला. त्याने पैशांच्या बॅगा बदलून त्यामध्ये कागदाचे बोळे भरले आणि तक्रारदाराना देऊन १ कोटी २० लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक गोष्टी, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी पीरसिंह देवडा याने त्याचा भाऊ युवराज सिंग देवडा (वय २४, रा. सिरोही, राजस्थान) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. पायधुनी पोलिसांच्या पथकाने सातत्यपूर्ण तपास करून १४ ऑगस्ट रोजी राजस्थान गाठले आणि युवराज सिंग याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पीरसिंह देवडा (वय ३०) सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या