Ticker

6/recent/ticker-posts

६३ कोटींच्या सायबर फसवणुकीत एपीके फाईल बनवणारा आरोपी अटकेत

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने ६३ कोटी रुपयांच्या मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत एपीके (APK) फाईल्स बनवणाऱ्या मुख्य आरोपीस अटक केली आहे. आरोपीने तयार केलेल्या ९२ एपीके फाईल्सचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी देशभरात हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी तब्बल २,९९३ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

यात एकट्या महाराष्ट्र आणि मुंबईतील ५१२ तक्रारींचा समावेश आहे. पोलीस तपासात आरोपीकडून ३७,२०० लोकांचा बँकिंग डेटा हस्तगत करण्यात आला असून, त्याने तयार केलेल्या उर्वरित ९६७ फाईल्स विकल्या गेल्या असत्या तर ही फसवणूक १०० कोटींच्या पार गेली असती असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हा आरोपी केवळ एपीके फाईल्स विकत नव्हता तर नागरिकांची वैयक्तिक आणि बँक खात्यांची माहितीही गुन्हेगारांना पुरवत होता. तो प्रत्येक फाईल १५ ते २० हजार रुपयांना ४० ते ४५ दिवसांच्या वैधतेसह विकायचा आणि फाईलचा संपूर्ण ताबा खरेदीदाराला द्यायचा. गॅस बिल बाकी असणे किंवा आरटीओ ई-चालान प्रलंबित असल्याचे खोटे मेसेज पाठवून नागरिकांना लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जायचे. नागरिक लिंकवर क्लिक करताच मोबाईलचा ताबा मिळवून खात्यातून पैसे लांबवले जात असत. दक्षिण मुंबईतील एका व्यक्तीची ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार डी बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तपासादरम्यान पोलिसांनी थेट या रॅकेटच्या मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली. मूळचा झारखंडचा असलेला हा आरोपी सायन्स पदवीधर असून आयटी क्षेत्रातील ज्ञानाचा वापर करून तो गेल्या काही वर्षांपासून हा सायबर गुन्ह्यांचा धंदा करीत होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या