मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई गुन्हे शाखेने शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याच्या संशयावरून ३७ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसर, कांदिवली, मालाड, कुर्ला, टिळक नगर आणि मानखुर्द या परिसरांमध्ये छापेमारी केली. संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम राबवली. प्राथमिक तपासात काही व्यक्ती भारतात आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवेश करून राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या ओळखीची आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आधार कार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांची सत्यता तपासली जात असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
तपासादरम्यान काही जणांनी पश्चिम बंगाल सीमेमार्गे भारतात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही घुसखोरांनी आसाम सीमेलाही प्रवेशासाठी वापरल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांचा आणि संभाव्य नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
गुन्हे शाखा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, भारतात बेकायदेशीर प्रवेश करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली, त्यामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले की, शहरातील बेकायदेशीर परदेशी नागरिकांचा शोध घेऊन स्थलांतरविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद किंवा बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या