Ticker

6/recent/ticker-posts

एटीएममध्ये प्लास्टिक पट्टी लावून पैशांची लूट करणारी भांडुपमधील टोळी गजाआड

मुंबई, दादासाहेब येंधे : एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे भासवून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे उडवणाऱ्या टोळीचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोटारसायकलसह १.२९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भांडुपमधील ‘बँक ऑफ बडोदा’च्या सचदेव कॉम्प्लेक्स येथील एटीएममध्ये ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा होऊनही त्यांना रोख रक्कम मिळत नव्हती. अशा प्रकारच्या पाच स्वतंत्र तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बँकेच्या ३७ वर्षीय शाखा व्यवस्थापकांनी पोलिसांत धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची दोन दिवस तपासणी केली. यात आरोपींची एक विशेष ‘ट्रिक’ समोर आली. आरोपी एटीएममध्ये घुसून कॅश डिस्पेंसरच्या स्लॉटमध्ये एक पातळ राखाडी रंगाची प्लास्टिकची पट्टी लावत असत. त्यामुळे ग्राहकांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास त्या नोटा मशीनच्या स्लॉटमध्येच अडकत होत्या. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समजून ग्राहक तिथून निघून गेल्यावर, आरोपी पुन्हा आत येत आणि अडकलेली रोकड काढून पोबारा करत होते.

सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार २१ वर्षीय मोहम्मद झियाद उर्फ अयान इरशाद अहमद याला अटक केली. त्याच्या तपासातून अरिफा अझीम दुकंदर (४५) आणि नमिरा अझीम दुकंदर (२४) या दोन महिला साथीदारांचादेखील सहभाग समोर आला. या दोन्ही महिलांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी ८० हजार रुपयांची मोटारसायकल, १० हजार रुपयांचा मोबाईल, ३९,५०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली प्लास्टिकची पट्टी जप्त केली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या