मुंबई, दादासाहेब येंधे : तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने अत्यंत चिकाटी, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर २०२३ मध्ये बेपत्ता झालेल्या एका ८ वर्षीय मुलाला सुखरूप शोधून काढलं आणि त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना २२ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली होती. अंधेरी पूर्व येथील स्नेह सदन बाल अनाथालयातून ८ वर्षीय अनिस खान अचानक बेपत्ता झाला होता. याबाबत अनाथालयातील कर्मचारी चंचल प्रसाद नायर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. त्याचदरम्यान पोलिसांना समजलं की, अनिसला काही दिवसांपूर्वी जुहू चौपाटी परिसरात बेवारस अवस्थेत फिरताना जुहू पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे २२ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला स्नेह सदन बाल अनाथालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तो तेथून पळून गेला होता.
या प्रकरणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची नोंद दोन वेगवेगळ्या नावांनी झाली होती. एका ठिकाणी तो अनिस खान, तर दुसऱ्या ठिकाणी अमन शेख या नावाने नोंदवला गेला होता. मात्र त्या मुलाकडे कोणतेही ओळखपत्र किंवा नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध नव्हती. यामुळेच तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस उपायुक्त, पश्चिम परिमंडळ-१० यांच्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले. पीएसआय सागर हुजरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रं हाती घेतली.
पोलिसांनी सीसीतीएनएस, आयसीजेएस पोर्टल, मिसिंग पर्सन सर्च सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइन १०९८ यांचा वापर करून हरवलेल्या मुलांच्या नोंदी तपासल्या. यासोबतच मुंबईतील विविध बाल अनाथालये आणि बालगृहांना भेटी देऊन २०२३ पासून दाखल झालेल्या ८ ते १३ वयोगटातील मुलांची माहिती गोळा करण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान माटुंगा येथील बाल सुधारगृहात 'अमन शेख' या नावाने दाखल असलेल्या एका मुलाचा फोटो पोलिसांच्या हाती लागला. तोच फोटो क्लू ठरला कारण, फोटो पाहिल्यानंतर तो मुलगा बेपत्ता अनिस खान असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी मालवणी परिसरातील त्याच्या संभाव्य नातेवाईकांशी संपर्क साधला. फोटो दाखवताच नातेवाईकांनी मुलाची ओळख पटवली आणि तो त्यांचा भाचा असल्याचे सांगितलं. अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिसला त्याच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले.
या प्रकरणाचा यशस्वी तपास करत एमआयडीसी पोलिसांनी एका मुलाला त्याचं कुटुंब पुन्हा मिळवून दिलं. तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली.

0 टिप्पण्या