Ticker

6/recent/ticker-posts

बनावट 'एचडीएफसी एर्गो हेल्थ' कॉल सेंटरचा पर्दाफाश; १२ जण अटकेत, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दादासाहेब येंधे : एचडीएफसी इर्गो हेल्थ पॉलिसीच्या नावाखाली ग्राहकांना नो क्लेम बोनसचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १७ लाख १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एका फिर्यादीने २२ जून २०२६ रोजी तक्रार दिली होती की, त्यांना एचडीएफसी इर्गो हेल्थ पॉलिसीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फोन आला होता. १ लाख ५३ हजार ८२५ रुपयांचा नो क्लेम बोनस मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली आणि ३ लाख ४३ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोवंडी पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कुर्ला येथील कोहीनूर सिटी मॉलमध्ये असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. तेथे आरोपी ग्राहकांना फसवण्यासाठी तयार केलेली स्क्रिप्ट वापरत असल्याचे आढळले. या पहिल्या कारवाईत ६ आरोपींना अटक करून लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड आणि कॉम्प्युटर जप्त करण्यात आले. फसवणुकीच्या पैशातून आरोपी सोन्याची नाणी आणि वस्तू खरेदी करत असल्याचे उघड झाले.

अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असल्फा व्हिलेज आणि कोहीनूर मॉलमध्येच आणखी दोन बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या ठिकाणांवरही छापे टाकून एकूण १२ आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून २९ कॉम्प्युटर, ५ लॅपटॉप, १५ मोबाईल, ३ राउटर आणि २८.०५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

आरोपींनी परराज्यातील अनेक ग्राहकांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात समोर आले असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणाही अनोळखी व्यक्तीला बँक तपशील, कार्ड डिटेल्स किंवा ओटीपी देऊ नका. फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गोवंडी पोलीस पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या