Ticker

6/recent/ticker-posts

२८ वर्षे बनावट डॉक्टर बनून वावरणाऱ्याच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

मुंबई, दादा


साहेब येंधे: मुंबई गुन्हे प्रकटीकरण कक्षाने तब्बल २८ वर्षांपासून स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करणाऱ्या एका तोतया डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने बनावट ओळखपत्रांच्या आधारे डॉक्टर असल्याचा बनाव करून विविध बँकांमध्ये खाती उघडली होती व इतर साथीदारांच्या मदतीने मागील तीन वर्षांत सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतील सुमारे १० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा संशय प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे.


गुन्हे शाखेच्या कक्ष-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व्यक्ती आणि कंपन्यांची कागदपत्रे, प्रकल्प अहवाल तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. त्यामुळे या फसवणुकीचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीसांचे म्हणणे आहे.

चौकशी दरम्यान आरोपीकडून " डॉ. धर्मेंद्र कुमार" या नावाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, विविध संस्थांनी दिलेली प्रमाणपत्रे तसेच वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे औषधोपचाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे

या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट ओळख वापरणे आदी कलमांसह वैद्यकीय व्यवसाय आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला १६ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या