मुंबई, दादासाहेब येंधे : रे रोड रेल्वे स्थानक परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. चांगला संसार सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात ठेवून संतापलेल्या पतीने प्रियकराची क्रूरपणे हत्या केली.
रे रोड रेल्वे स्थानकाजवळ भररस्त्यात हा थरार घडला असून याप्रकरणी वडाळा पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीची पत्नी घर सोडून तिच्या प्रियकरासोबत राहू लागली होती. पत्नीने अशा प्रकारे साथ सोडल्यामुळे पतीचे रक्त खावळले होते. तो प्रियकराच्या शोधात होता. रे रोड रेल्वे स्थानकाजवळ प्रियकर समोर येताच पतीचा संयम सुटला आणि त्याने तिथेच राड्याला सुरुवात केली.
सुरुवातीला दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पतीनं प्रियकराला आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच त्याचा राग शांत झाला नाही, तर त्यानं प्रियकराला जमिनीवर आपटलं आणि जवळच असलेला एक मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याचे डोकं छिन्नविच्छिन्न केलं. भररस्त्यात घडलेला हा रक्तरंजित प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियकराचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

0 टिप्पण्या