मुंबई, दादासाहेब येंधे : एका सराईत गुन्हेगाराने पत्नीला त्रास देण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कौटुंबिक वादातून पत्नीला त्रास देण्यासाठी त्याने तब्बल ४ तास ‘कोंबडा’ बनवून ठेवले आणि तिला बेदम मारहाण केली आहे.
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अरबाज सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीच १९ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. आरसीएफ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाज सय्यद याने कौटुंबिक वादातून आधी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने पत्नीला घरातच कोंडून ठेवत आरोपीने हातात तलवार घेऊन पत्नीला जीवे मारण्याची आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. तसेच त्याने आपल्या पत्नीला घरात सलग ४ तास ‘कोंबडा’ बनून राहण्याची शिक्षा दिली.
या छळातून पीडितेने स्वतःची सुटका करत जीव वाचवून तिच्या माहेरी निघून गेली. मात्र, आरोपी अरबाजचे तिचा पाठलाग करत तिच्या माहेरीही पोहोचला. तिथे त्याने आरडाओरड करत रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. पत्नीचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि टाके घातलेले स्पष्ट दिसत आहेत.
घटनेनंतर तात्काळ पीडितेच्या कुटुंबीयांनी आरसीएफ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. वेळेचा विलंब न लावता पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी अरबाज सय्यद याला ताब्यात घेतले.

0 टिप्पण्या