काळाचौकी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीला पकडले
मुंबई,दादासाहेब येंधे : लालबागच्या खामकर मसाल्याच्या दुकानातील १३ लाख ८६ हजार रकमेची चोरी केल्याप्रकरणी दुकानातील नोकराला काळाचौकी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उत्तर प्रदेश अयोध्या येथून अटक केली आहे.
अजय कुमार श्यामसुंदर रावत (वय,२८) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून साडेदहा लाखांची रक्कम जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. खामकर मसाला दुकानाचे मालक आजारी असल्याने ते काही दिवस दुकानात येत नव्हते. त्यामुळे तेवढ्या दिवसांची रोख रक्कम दुकानातील गल्ल्यात ठेवण्यात आली होती. गल्ल्याच्या चाव्या विश्वासू नोकर आरोपी अजय याच्याकडेच होत्या. त्याचा गैरफायदा घेत आरोपी अजय याने गुरुवार १६ एप्रिलच्या मध्यरात्री मसाल्याच्या दुकानातील धंद्याची मागील आठ दिवसात जमा झालेली १३, ८०,२०० रुपयांची रक्कम चोरून अजय याने तेथून पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने काळाचौकी पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी चोरी झाल्याची तक्रार दाखल करून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. आरोपी अजय हा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात राहत असल्याच्या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून आरोपीस अयोध्या, उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेल्या रकमेपैकी दहा लाख ४७ हजार ५२० रुपये जप्त केले.
सदरची उत्कृष्ट कामगिरी ही श्री घनश्याम पलंगे, सहायक पोलीस आयुक्त, भोईवाडा विभाग, मुंबई, श्री. विजयकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळाचौकी पोलीस ठाणे, मुंबई यांचे मार्गदर्शनखाली सपोनि. हसन मुलाणी, पोउपनि शीतल माने, पो. हवा. अमर चन्ने, पो. शि. प्रशांत पवार, म.पो.शि. तेजस्विनी गवारी, पो.शि चंद्रकांत कुंभार, पो.शि. संकेत नायकवाडी, पो. हवा. गोविंद ठोके (तांत्रिक मदत) यांनी केली आहे.

0 टिप्पण्या