मुंबई, दादासाहेब येंधे : वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात घडलेल्या अभिनव कुमार हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी हत्येनंतर पसार झालेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. नीरज कुमार विलास चौधरी (वय, ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हत्येची घटना १३ एप्रिल २०२६ रोजी खेरवाडीतील कल्पतरू स्पार्कल परिसरात घडली होती. मृत अभिनव कुमार याच्यावर आरोपीने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली होती.
मयत अभिनव कुमार हा एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. विशेष म्हणजे, याच महिलेचे लग्न आरोपी नीरज कुमार याच्याशी ठरले होते. मात्र, अभिनवसोबत असलेल्या संबंधांमुळे संबंधित महिलेने नीरजसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपला विवाह मोडल्याचा राग मनात धरून नीरजने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने अभिनवचा पाठलाग करून संधी मिळताच त्याची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी नीरज कुमार मुंबईतून पळून गेला. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रेल्वेने विविध ठिकाणी प्रवास केला. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना त्याचे लोकेशन नागपूर आणि त्यानंतर कोलकाता येथे असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी आपली पथके या दोन्ही शहरात रवाना केली. आरोपी प्रथम हावडा स्टेशनवर पोहोचला होता, मात्र तिथूनही त्याने पळ काढला. आरोपी नीरज हा कोलकात्याहून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला कोलकाता एअरपोर्टवर गाठले आणि दिल्लीला जाण्यापूर्वीच त्याला बेड्या ठोकल्या. अवघ्या ६० तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.
0 टिप्पण्या