Ticker

6/recent/ticker-posts

खोया हुआ प्यार, परत मिळवून देण्याच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक

मुंबई, ( दादासाहेब येंधे) : इन्स्टाग्रामवरील ‘खोया हुआ प्यार’ अशा फसव्या पोस्टच्या माध्यमातून प्रेमभंग झालेल्या तरुणींना फसवणाऱ्या राजस्थानमधील एका टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १६ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पायधुनी येथील  एका ५२ वर्षीय महिलेच्या घरातून १६ लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. तपासात समोर आले की, महिलेच्या मुलीचा नुकताच प्रेमभंग झाला होता. तिने इन्स्टाग्रामवर ‘इरफान खानजी’ नावाच्या पेजवर संपर्क साधला. या पेजवरील लोकांनी स्वतःला ‘मौलवी’ भासवून, ‘प्रेमातील अडथळे दूर करण्यासाठी’ सोन्या –चांदीच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला. मुलीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घरातील सोने दिले व त्या चोरांनी ते घेऊन पळ काढला. प्रेमातील अडथळा दूर करायचा असेल तर काही विधी करावे लागतील आणि काही वस्तू आणाव्या लागतील, असे त्यांनी तिला सांगितले. त्यात चांदीची मटकी, सोन्याची माशी, सोन्याचा दिवा, हात्तातोडी वनस्पती, सोन्याचे खिळे आदींचा समावेश होता. पैसे दिले तर आम्ही या वस्तू आणून विधी करून आणि तुला तुझे प्रेम परत मिळवून देऊ, असा दावा त्या चोरट्यांनी केला होता.


गुन्हे शाखा कक्ष-२ ने या प्रकरणाचा तपास करत तांत्रिक विश्लेषणानंतर विकास मनोजकुमार मेघवाल (वय, २२) आणि मनोज श्यामसुंदर नागपाल (वय ३०) या दोन आरोपींना श्रीगंगानगर, राजस्थान येथून अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी हरियाणा आणि दिल्लीतील अनेक तरुणींना अशाच प्रकारे फसवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.


गुन्हे शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मांजरे, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, तसेच उतेकर, तळेकर, पाडवी, बोरसे, थिमटे, डेरे, हरड, सय्यद, आव्हाड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून या चोरट्यांना अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या