मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबई पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये ३९६ ग्रॅम वजनाचे कोकेन, १७० ग्रॅम वजनाचे एमडी आणि ९०० कोडेनमिश्रीत बॉटल्स असा १ कोटी ६५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच एका विदेशी नागरिकासह चौघांना अटक केली. नयुम शेख, संजीब सरकार, मोहम्मद बाष्टिस्टा आणि फेथ इग्रीबोसा अशी या चौघांची नावे आहेत. यातील मोहम्मद आणि फेथ हे नायजेरीयन नागरिक असून त्या चौघांना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवीन वर्षांच्या पार्टीसाठी काहीजण ड्रग्ज तस्करीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले व त्यांच्या पथकाने कुर्ला येथून संजीब सरकार या ४० वर्षांच्या आरोपीस अटक केली. संजीब हा कोकेनची डिलीव्हरीसाठी तिथे आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी १ कोटी १८ लाखांच्या ३९६ ग्रॅम वजनाच्या कोकेनसह शिताफीने अटक केली. दुसऱ्या कारवाईत या युनिटने गोवंडीतील देवनार परिसरातून नयुम शेख या २८ वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ९०० कोडेनमिश्रीत बॉटल्सचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये इतकी आहे. त्याचवेळी वरळी युनिटने आग्रीपाडा येथून दोन नायजेरीयन नागरिक मोहम्मद आणि फेथ या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १७० ग्रॅम वजनाचे एमडी डूग्ज जप्त केले असून त्याची किंमत ४२ लाख ५० हजार इतकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा