मुंबई, दि. २ : माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये बांधणी करण्यात आलेल्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.
'महेंद्रगिरी'ची ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेलथ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते.
या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार यामिनी जाधव, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरीकुमार आणि एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंगल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि एमडीएलचे कर्मचारी उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, महेंद्रगिरी या निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशकांमध्ये बसविण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमई कडून खरेदी करण्यात आली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा