मुंबई, दि: ३१ : पाचशे रुपयांच्या सोळा हजार बोगस नोटांसह सौजन्य भूषण पाटील नावाच्या एका ३१ वर्षांच्या तरुणाला मरोळ युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ऐंशी लाख रुपयांच्या बोगस नोटा जप्तक केल्या असून त्याच्या इतर सहकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सौजन्य याच्या अटकेने भारतीय चलनात बोगस नोटा आणण्याचा या टोळीचा प्रयत्न फसला आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने बुधवार ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काहीजण बोगस नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असून या बोगस नोटा घेऊन ते पवई परिसरात येणार आहेत अशी माहिती पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, गणेश तोडकर, अफरोज शेख, कांबळे, खेडकर, धनवडे, चिकणे, खेडकर, घारगळकर यांनी पवईतील साकिविहार रोड, आंबेडकर गार्डनजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी दुपारी दोन वाजता तिथे एका युनिकॉर्न बाईकवरुन एक तरुण आला होता. या तरुणाची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर या अधिकाऱ्यांना त्यात पाचशे रुपयांच्या सोळा हजार बोगस नोटांचा साठा सापडला. सुमारे ऐशी लाख रुपयांच्या बोगस नोटा जप्त करुन त्याला पोलिसांनी युनिट कार्यालयात आणले. चौकशीत त्याचे नाव सौजन्य पाटील असल्याचे उघडकीस आले. या बोगस नोटांची छपाई करुन त्याच्या डिलीव्हरीसाठी तो पवई येथे आला होता. मात्र डिलीव्हरीपूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकाऱ्यांची नावे समोर आली असून त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला क्षती पोहचविण्याच्या उद्देशाने या नोटांची छपाई केली होती.

0 टिप्पण्या