तिघांकडून १२ गाड्या जप्त
दि. २५/११/२०२२
मुंबई, दादासाहेब येंधे : पोलीस आणि लष्कर भरतीची तयारी करत असताना पटकन पैसा कमावण्यासाठी अन्य दोघांच्या जोडीने दुचाकी चोरायला त्याने सुरुवात केली. दीड दोन महिन्यात तिघांनी नऊ गाड्या चोरल्या. पण, वेळीच घाटकोपर पोलिसांनी त्यांना पकडून गजाआड केले. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १२ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
अंकित मिश्रा, किरण पाटील, गणेश सावंत अशी आरोपींची नावे असून अंकित हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. किरण आणि गणेश एकाच गावचे असून दोघेही मानखुर्द परिसरात राहतात. अंकित हा काही दिवसांपूर्वी मानखुर्द येथील एका केक शॉपमध्ये कामाला असताना त्याची या दोघांशी ओळख झाली. गणेश हा त्याच परिसरात येस बँकेत सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. त्याचबरोबर तो पोलीस आणि लष्कर भरतीची तयारी करत होता. मात्र, अंकितने गणेश आणि किरणला दुचाकी चोरून झटपट पैसा कसा कमवता येईल याबद्दल सांगितले. त्या लालसेला भुलून चोरी करण्या सहमती दिल्यानंतर अंकितने तो पूर्वीच्या हॉटेलमध्ये कामाला होता त्याच हॉटेलच्या मालकाची ॲक्टिवा चोरली. त्यानंतर अंकितने घाटकोपर मधल्या त्याच्या मित्राचीदेखील बुलेट चोरली.
दोन महिन्यात तिघांनी मिळून नऊ गाड्या चोरल्या. या चोरीप्रकारणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर एसीपी आनंद नेर्लेकर, वरिष्ठ निरीक्षक संजय डहाके, निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे तसेच कोयंडे, कंक, देवार्डे, म्हस्के आदींच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तीन आरोपींना अटक करून गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तीन गाड्या आणि चोरलेल्या नऊ गाड्या अशा एकूण १२ दुचाकी जप्त करण्यात आल्यास. त्यामध्ये तीन बुलेट तसेच सहा ॲक्टिवा आहेत.
Press Note

0 टिप्पण्या