मुंबई, दि. २३ : गोवंडी परिसरात पार्क केलेला डंपर देवनार पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधून काढला आहे. देवनार पोलिसांनी सोशल मीडियाची मदत घेऊन तीन चोरट्यांचा महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सुरज सिंह ठाकुर, सुनील कॉल, शहबाज खान असे त्या तिघांचे नाव आहेत. चोरलेला ट्रक गुजरातला नेण्यासाठी त्या तिघांना प्रत्येकी पाच हजार रुपये मिळणार होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.
गवंडी येथे राहणाऱ्या मोहम्मद शेख यांनी त्यांच्या मालकीचा डंपर गोवंडी येथील पार्किंग मध्ये उभा केला होता. दुसऱ्या दिवशी ते पार्किंग जवळ गेले असता डंपर जागेवर दिसला नाही. ट्रक चोरी झाल्या प्रकरणी शेख यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवनार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला.
परिमंडळ-६ चे पोलीस उपयुक्त हेमराज राजपूत यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मुलानी, सहाय्यक निरीक्षक श्रीराम घोडके, उपनिरीक्षक सुपे, जुवाटकर, धुमाळ, तिटकारे, मोहिते, कुंभार यांच्या पथकाने तपास सुरू केला. घोडके यांनी महाराष्ट्र-गुजरात, मध्य प्रदेश महामार्गावरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील तलासरी चेक पोस्ट येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तो ट्रक गुजरातला गेल्याचे त्यातून उघड झाले. याची माहिती गुजरात येथे स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेला देण्यात आली. घोडके यांनी वासद पोलीस ठाण्याची याप्रकरणी मदत घेतली. गुजरातमधील आनंद जिल्हा येथून पोलिसांनी तो ट्रक जप्त केला. पोलिसांनी ठाकूर, खान, कॉलला ताब्यात घेऊन देवनार पोलिसांच्या स्वाधीन केले. एका आरोपीने तो ट्रक चोरून ठाण्याला नेला होता. त्यानंतर त्या तिघांनी तो ट्रक गुजरातला नेल्याचे तपासात समोर आले आहे.
0 टिप्पण्या