मुंबई, दि. २६ : समाज माध्यमांवर पार्ट टाइम नोकरी आणि घरबसल्या कमाईच्या जाहिराती देऊन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचीच गंभीर दखल घेऊन मुंबई सायबर पोलिसांनी कारवाई करत १८ जणांच्या सायबर चोरांच्या टोळीला नुकतीच अटक केली आहे. यामध्ये बहुतांशजण राजस्थानचे असून एका चीन नागरिकाचा देखील समावेश आहे पोलिसांनी या १८ जणांकडून फसवणुकीसाठी वापरलेले ५३ मोबाईल, ११५ सिम कार्ड तसेच इतर साहित्य हस्तगत केले आहे. या टोळीने देशातील शेकडो नागरिकांची लाखोंची आर्थिक फसवणूक केली आहे.
मुंबई महापालिकेतील एका इंजिनियरने इंस्टाग्रामवर ॲमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांच्या नावाने पार्ट टाइम नोकरीची जाहिरात पाहिली. घरी बसून एक ते दोन तास वेगवेगळ्या प्रकारचे टास्क, उत्पादने विक्री करून हजारो रुपये कमविता येतात असे भासविण्यात आले. त्यानुसार या इंजिनियरने उत्पादनांमध्ये गुंतवणूक करून वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली. वॉलेटमध्ये कमिशन म्हणून जमा होणारे रक्कम दिसत होती. मात्र, रक्कम काढायला गेल्यावर काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. इंजिनीयरने थोडे थोडे करून जवळपास ३४ लाख रुपये गुंतविले. रक्कम परत मिळत नसल्याने त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्याने उपायुक्त बालसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय चंदनशिवे, मंगेश देसाई, संदीप पंचांगणे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
इंजिनीयरने दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक पुरावांच्या आधारे पोलिसांनी ही टोळी भाईंदर येथून कार्यरत असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार भाईंदर, मिरा रोड, दादर या परिसरात शोध मोहीम हाती घेऊन १८ जणांची धरपकड करण्यात आली. या टोळीकडून विविध नामांकित कंपन्यांच्या नावांचे ४७ हजार रबरी शिक्के जप्त करण्यात आले. विविध १७ बँकांचे चेकबुक अनेक खातेदारांचे पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, डेबिट कार्ड विविध प्रकारचे सॉफ्टवेअर आणि एप्लीकेशन तयार करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
Press Note

0 टिप्पण्या