मुंबई : मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-६ ला मुंबई व राज्यातील विविध भागांतून चोरलेल्या स्मार्टफोनचे घबाड सापडले आहे. त्या घरातून ४९० मोबाईल नऊ किलो ५४० ग्रॅम वजनाचा गांजा आणि १७४ दारूच्या बाटल्या असा तब्बल ७४ लाख ७८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरलेले मोबाईल, गांजा व दारूचा बेकायदेशीर धंदा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पूर्व उपनगरात राहणारा एक व्यक्ती चोरीचा मोबाईल विकत घेऊन त्याचा साठा करतो अशी माहिती युनिट-६ चे अंमलदार कोळेकर यांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक रविंद्र साळुंखे यांनी एक पथक नेमून ती व्यक्ती चोरीचे मोबाइल खरेदी करून त्याचा साठा कोठे करून ठेवते तसेच त्या मोबाईलचे पुढे काय करते याची माहिती काढण्यास सुरुवात केली.
१५ तारखेला ती व्यक्ती चोरीचे मोबाईल घेऊन महाराष्ट्र नगर येथे येणार असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेव्हा ती व्यक्ती राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत तब्बल ४९९ स्मार्टफोन त्यात ४१ आयफोन, एक लॅपटॉप, हिटर मशीन, हिटर गण असे साहित्य तसेच नऊ किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि दारूच्या १७४ बाटल्या, दोन तलवारी असा मुद्देमाल मिळून आला. मेहबूब खान (३७) असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या घरात हे घबाड सापडले. या कामात त्याला मदत करणारा फैयाद शेख (वय ३१) याला देखील पोलिसांनी अटक केली. काही महिन्यांपूर्वी युनिट-६ च्या पथकाने अशाप्रकारे चोरीच्या मोबाईलची खरेदी करून त्याचा साठा करणारे एक रॅकेट उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

0 टिप्पण्या