मुंबई : साकीनाका परिसरात नसीम खान नामक टेलरचा मृतदेह राहत्या घरातील बेडमध्ये सापडला होता. त्याच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर असलेला त्याचा भाचा यांचा हात असल्याचे उघड झाले. त्यानुसार, पोलिसांनी अवघ्या आठ तासांतच मारेकऱ्यांची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी मृत नसीम खान याची पत्नी रुबीना शेख (वय २२) आणि त्याचा भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी (वय २१) यांना या हत्येप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार लग्न झल्यापासूनच नवरा-बायकोचे पटत नव्हते. टेम्पोवर लोडर म्हणून काम करणार नसीमचा भाचा फारुकी हा त्यांच्याच कुटुंबात राहत होता. गेल्या चार ते पाच महिन्यापासून रुबिनासोबत त्याचे सूर जुळले होते. त्यामुळे पळून जाऊन लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. त्यानंतर त्यांनी डोंबिवलीत भाडेतत्त्वावर घर घेतले होते. मात्र, त्याच्यावर संशय नको म्हणुन तो साकीनाका येथे ये-जा करत होता.
नसीम खान हा १५ तारखेला गाढ झोपेत असताना रुबीना हिने त्याच्या डोक्यात चिनीमातीची पिगी बॅंक मारली. त्याला बेशुद्ध करून त्यांचा पळून जाण्याचा हेतू होता. मात्र, तो बेशुद्ध न होता तडफडू लागला. तेव्हा फारूकी याने त्याला मागून घट्ट पकडले आणि रुबीनाने त्याच्या तोंडावर उशी घट्ट धरली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. तेव्हा नायलॉनच्या दोरीने तिने त्याचा गळा आवळला आणि त्याला ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये भरून दोघे पसार झाले. तो डोंबिवलीला गेला तर तिला त्याने कोपरखैरणे येथील एका झोपडपट्टी मध्ये लपवून ठेवले होते.
नाईट कॉल आणि अडकले मारेकरी
रुबीनाच्या मोबाईलचे सीडीआर पोलिसांनी काढले. ज्यात उशिरा रात्री ती फारुकी याच्याशी सतत बोलत असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा साकीनाक्यातील घराजवळ जमलेल्यांना त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी फारूकी यालाही बोलावण्यास सांगितले. नातेवाईक बोलावत असल्याने पोलिसांना आपल्यावर संशय आलाय याची त्याला जराही भनक लागली नाही आणि तो साकीनाका येथे आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या मानेवर नखाने ओरबाडल्याच्या ताज्या खुणा तसेच हाताला लागलेला मार त्यांना दिसला. सुरुवातीला त्याने कबुली दिली नाही. मात्र, नंतर त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याच्यासोबतच रुबिनाचा देखील गाशा गुंडाळण्यात पोलिसांना यश आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे यांनी सांगितले.
Press Note

0 टिप्पण्या