मुंबई : पहाटेच्या वेळेस रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लूटमार करणारे दोघे सराईत गुन्हेगार पार्कसाईट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांचा तिसरा साथीदार रिक्षाचालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
समीर (३५, नाव बदललेले) हा तरुण ५ तारखेला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विक्रोळी स्थानक येथून एलबीएस रोडने पायी जात असताना त्यांना एका रिक्षाचालकाने सुर्यानगर जाणार का? अशी विचारणा केली. समीर हो म्हणत रिक्षात बसला. रिक्षात आधीच दोघेजण बसले होते. तर काही अंतरावर रिक्षा गेल्यानंतर त्या दोघांनी जबरदस्ती करत समीरच्या खिशातील दहा हजारांची रोकड, मोबाईल फोन आणि एका कानातले सोन्याचे रिंग काढून घेतली. मग त्याला सुर्यानगर येथे न सोडता उमा टॉकीज परिसरात सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर समीरने पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोहन जगदाळे, नितीन कदम तसेच योगेश गायकवाड, प्रवीण गोसावी, राहुल नवले अजित पाटील कोल्हे या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु त्यादिवशी मुसळधार पाऊस झाल्याने रिक्षाचे नंबर प्लेट व्यवस्थित दिसत नव्हते. तरीदेखील तांत्रिक तपास व खबऱ्यांना कामाला लावून पोलिसांनी आरोपींची माहिती मिळवली. गुन्ह्यातील आरोपी कल्याण जवळील बनेली येथे राहणार असून ते रेकॉर्डवरचे आरोपी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी एकाला डोंबिवलीत पकडले. मग त्याच्या साथीदाराला बनेली येथे पकडले.कमिल हजारू आणि मुसा शेख अशी त्या दोघांची नावे असून त्यांचा तिसरा साथीदार रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे. हे आरोपी लोकल तसेच रिक्षांमध्ये प्रवाशांची लूटमार करतात.
0 टिप्पण्या