रागाने डोक्यात दगड घालून हत्या
मुंबई : गिरगाव परिसरात मृत अवस्थेत सापडलेल्या गजानन रामचंद्र पवार (वय ५५) यांची आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागात हत्या केल्याचे आरोपीच्या अटकेतून समोर आले आहे. सुरज यादव (वय२३) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून तो भंगारवेचक आहे. त्याने अशाच प्रकारे गोव्यामध्येदेखील डोक्यात दगड घालून एकाची हत्या केल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जून रोजी गजानन रामचंद्र पवार यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. चौकशीत डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला होता. रेल्वे सीसीटीवी फुटेज व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज यांच्या केलेल्या पाहणीवरून संशयित आरोपी हा वांद्रे रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दिसत होता.
त्यानुसार मिळालेल्या फुटेजच्या आधारे आरोपीचा फोटो डेव्हलप केला. साधारण आठ ते दहा दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. याचदरम्यान वांद्रे परिसरात हॉटेल बालाजी, हिल रोड या परिसरात काही सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत मोफत जेवण दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी काही कचरावेचक तरुण जेवण करण्याकरता येतील हे लक्षात घेऊन पोलिसांनी सापळा रचून संशयिताला तेथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चौकशीत त्याचे नाव यादव असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या