नवी मुंबई : खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील दहिगाव येथील महिला रेश्मा सचिन गरुडे (वय३३ ) या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष -२ ने २५ तासांत अटक केली आहे. जयंत सुरेश कोळखेकर (वय २५), असे या आरोपीचे नाव आहे.
२२ मे रोजी १० वाजता राहत्या घरातून शतपावली करण्यात जाते म्हणून रेश्मा गरुडे घराबाहेर गेल्या. त्या परत न आल्याने दिनांक २३ मे रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. या महिलेचा शोध सुरू असताना २३ मे रोजी गणू पाटील, रा. आदई गांव यांच्या जागेमध्ये बांधकाम सुरू असलेल्या चार मजली इमारतीच्या टेरेसवर या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार खांदेश्वर पोलीस ठाणे येथे ३०२ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ च्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान सदरचा गुन्हा सुरेश कोळखेकर यांनी केल्याबाबत खात्री झाली. त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता तो मयत महिलेची रिक्षा भाड्याने चालवत असे. त्यांच्यात झालेल्या वैयक्तिक वादातून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखा कक्ष-२, पनवेल, नवी मुंबईच्या पथकाने २४ तासांच्या आत आरोपीस अटक करून चोरी उघडकीस आणून उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे.
0 टिप्पण्या