दरोडा टाकण्याच्या आधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या
मुंबई : दक्षिण मुंबई येथील जवेरी बाजार येथे सोन्याच्या दुकानात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली. राजेश राय, सोनू उर्फ अमित चौधरी आणि संजय पाचाकडी अशी या तिघांची नावे आहेत त्यांचे इतर साथीदार हे पळून गेले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. त्या टोळीकडून पोलिसांनी दोन पिस्तूल जप्त केले आहेत.
झवेरी बाजार येथे काहीजण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळणी केली असता परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक ज्योती देसाई यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दयानंद जाधव, दिनकर इलग, प्रदीप लाड आणि पथकाने तपास सुरू केला. गुरुवारी रात्री पोलिसांच्या पथकाने मरीन लाईन येथील स.का. पाटील उद्यान येथे सापळा रचला. तेव्हा दोन जण ते कोणाचीतरी वाट पाहत उभी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पोलिसांनी सोनू आणि संजयला ताब्यात घेतले असता त्यांच्या चौकशीत राजेशचे नाव समोर आले. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत दोन रिव्हॉल्वर आढळून आले. कसून चौकशी केल्यावर त्या तिघांनी दरोड्याच्या तयारीची कबुली दिली. त्यांचे इतर तीन साथीदार पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
राजेश मुख्य सूत्रधार असून त्यानेच दरोड्याचा कट रचला होता. ठरल्यानुसार राजेश हा त्याच्या साथीदारांसोबत मुंबई आला. मुंबईत आल्यावर राजेशच्या काही साथीदारांनी रेकी केली. रेकी केल्यानंतर ही टोळी दरोडे टाकणार होती. मात्र, दरोडा टाकण्याचा आधीच या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजेशने ते पिस्तुल कुठून आणले होते याचा पोलीस तपास करत आहेत.
0 टिप्पण्या